क्राईम डायरीमुख्य बातम्या

अतिक्रमण हटाव पथकाच्‍या वसुलीचे दर्शन…; आठवडे बाजारातील राड्यात एकाची प्रकृती गंभीर; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव नगरपालिकेच्‍या अतिक्रमण हटाव पथकाचा कारभार कशापद्धतीने चालतो याचे दर्शन आठवडे बाजारात झालेल्या राड्यातून घडले आहे. अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्याने मला पैसे दे अन्यथा दुकान हटवतो, अशी धमकी दिली. त्‍यातून झालेल्या वादानंतर थेट गुंडांना बोलावून भंगार व्‍यावसायिक दोन भाऊ व त्‍यांच्‍या मुलांना बेदम मारहाण केली. या राड्यात एकाची प्रकृती गंभीर असून, त्‍याला अकोला येथील खासगी रुग्‍णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

सूत्रांनी सांगितले, की सुटाळापुरा येथील राजेंद्र इंगळे (56) यांचे आठवडे बाजारात भंगार खरेदी-विक्रीचे दुकान आहे. हे दुकान नगरपालिकेच्‍या जागेत येते. 27 मार्च रोजी दुपारी अतिक्रमण हटाव पथकातील मोहन अहीर हा इंगळे यांच्‍या दुकानावर आला. तुझे दुकान नगरपालिकेच्‍या जागेत आहे. तुला या बदल्यात मला पैसे द्यावे लागतील अन्यथा तुझे दुकान हटवेल, अशी धमकी त्‍याने दिली. यातून इंगळे आणि अहीरमध्ये वाद झाला. त्‍यानंतर अहीरने रामू अहीर, रतन अहीर, मनोज अहीर, आशिष अहीर, अक्षय अहीर, आदित्‍य अहीर, रोशन अहीर, श्याम अहीर, आकाश वायचाळ (सर्व रा. सतीफैल व विक्की पारधी, राम मदन वगर, रघू तिवारी, विलास वाशिमकर व अधिक 7 ते 8 जणांना बोलावून घेतले. या सर्वांनी राजेंद्र इंगळे, त्‍यांचा भाऊ गुलाब इंगळे, नीलेश इंगळे, मुलगा अभय इंगळे यांच्‍यावर लाठ्याकाठ्या, लोखंडी हातोडा, रॉड व राफ्टरने हल्ला केला. यात अभयला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्‍याला अकोला येथे हलविण्यात आले. या प्रकरणी राजेंद्र इंगळे यांच्‍या तक्रारीवरून मोहन अहीर व त्‍याच्‍या साथीदाराविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: