बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

अमडापूरमध्ये मशिद ट्रस्‍टचे शासकीय जमिनावर अतिक्रमण!; अध्यक्षांवर गंभीर आरोप

ट्रस्‍ट सदस्‍य शकूर मौलानाची यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अमडापूर (ता. चिखली) येथील जामा मशिद ट्रस्टच्या अध्यक्षांनी नागपूर- पुणे राज्यमहामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी अनधिकृत गाळे काढून ट्रस्टच्या नावाने भाडेपट्ट्यावर दिल्याची तक्रार मशिद ट्रस्टचे सदस्य शकूर मौलाना यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अमडापूर येथून नागपूर- पुणे राज्यमहामार्ग जातो. त्याला लागूनच जमा मशिद ट्रस्टच्या अंतर्गत येत असलेले मुस्लिम कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानच्या थोड्या अंतरावर चिखली- खामगावला जाण्यासाठी नवीन रस्ता बांधला असून, जुन्या रस्त्यावर मशिद ट्रस्टचे अध्यक्ष यांनी परस्पर अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी अनधिकृतपणे 15 बाय 22 आकाराचे 9 ते 10 गाळे काढून ते व्यवसाय धारकांना प्रत्येकी 70 हजार रुपये ट्रस्टची पावती न देता भाडेपट्ट्यावर दिले आहेत. या प्रकरणात अध्यक्षांनी ट्रस्टच्या अन्य सदस्य व शासनाची दिशाभूल केली असून व्यवसाय धारकांची सुध्दा फसवणूक केली आहे. तसेच अन्य शासकीय जागेवर सुध्दा ट्रस्टच्या नावाने अनधिकृत फलक लावला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ट्रस्टचे सदस्य अ. शकूर अ.मजीद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ट्रस्टच्या अध्यक्षांनी अतिक्रमण केलेली जागा ही ग्रामपंचायतीच्या मालकीची असतानासुद्धा ग्रामपंचायतीने याबाबतची तक्रार केली नाही. शासकीय जागेवर ट्रस्टच्या नावाची मालकी दाखवणाऱ्या अध्यक्ष तथा जमा मज्जीद ट्रस्टची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा तक्रारीत केली आहे. जामा मशिद ट्रस्टच्या नावाने 72 एकर जमीन आहे. ही जमीन ठोक्याने देऊन त्यातून दरवर्षी 7 ते 8 लाख रुपये मिळतात. या शिवाय गावात ट्रस्टच्या मालकीची जागा असून, त्याचे दर महिन्याला 4 ते 5 हजार रुपये व अन्य स्‍त्रोतातून 4 ते 5 हजार रुपये प्राप्त होतात. परंतु या व्यवहाराची कोणतीही माहिती अध्यक्ष इतर सदस्यांना देत नाहीत. 15 ते 16 वर्षांपासून ट्रस्टचे 4 सदस्य मयत असून, अध्यक्ष हे कुठल्याही प्रकारची मिटिंग न बोलवता मनमानी करून निर्णय घेत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जामा मशिद अमडापूरचे ट्रस्टी अ. शकूर अ.मजीद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: