बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

अवैध सावकारीचे गौडबंगाल ते काय?.. जिल्हा उपनिबंधकांच्‍या आदेशाविरोधात लोंढेंचे विभागीय कार्यालयात अपील; म्‍हणाले, हाेईल दूध का दूध…!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथील अवैध सावकारीच्‍या प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांनी बबनराव लोंढे यांच्‍याविरोधात निकाल देऊन गुन्‍हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. जिल्हा उपनिबंधकांच्‍या या आदेशाच्‍या विरोधात लोंढे यांनी अमरावती येथील विभागीय कार्यालयात धाव घेतली आहे. तशी माहिती त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हला दिली.

जिल्हा उपनिबंधकांनी लोंढे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे दाखल करण्याचे आदेश देताना संबंधित व्‍यवहारही रद्द ठरवले होते. याबद्दलचे वृत्त बुलडाणा लाइव्‍हमध्ये प्रसिद्ध होताच जिल्हाभर खळबळ उडाली. त्‍यामुळे श्री. लोंढे यांनी तातडीने आपलीही बाजू बुलडाणा लाइव्‍हकडे मांडली. त्‍यानंतर त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हला दिलेल्या पत्रात या प्रकरणाचे गौडबंगालही उलगडले आहे. त्‍यांनी म्‍हटले आहे, की कोरोना महामारीत त्‍यांची पत्‍नी व मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्‍यामुळे त्‍यांना जिल्हा उपनिबंधकांची नोटीस प्राप्‍त न झाल्‍याने तारखेला उपस्‍थित राहता आले नाही. त्‍यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी त्‍यांच्‍याविरुद्ध सावकारी कायद्यानुसार गुन्‍हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरुद्ध तातडीने अमरावती येथील विभागीय कार्यालयात धाव घेतली आहे. आजमितीस हे प्रकरण न्‍यायप्रविष्ठ आहे.

ज्‍या भूखंडावरून हे सर्व प्रकरण घडले, त्‍या भूखंडाच्‍या खरेदी-विक्रीवेळी जमनाप्रसाद तिवारी यांनी लिहिले होते की माझ्या अडचणीमुळे हा भूखंड विकत आहे. त्‍यामुळे याचा सावकारी पद्धतीशी कुठलाही संबंध नाही. असे रजिस्‍टर खरेदीवर लिखित स्‍वरुपात नमूद केलेले आहे. या भूखंडाबरोबरच आणखी काही भूखंडांची विक्री जमनाप्रसाद यांनी मला केली आहे. मात्र हा भूखंड मोक्‍याच्‍या ठिकाणी असल्याने त्‍याची आजमितीस असलेली किंमत पाहूनच तिवारी यांनी विनाकारण मानसिक त्रास देण्याच्‍या उद्देशाने हे पाऊल उचलले, असे श्री. लोंढे यांनी बुलडाणा लाइव्‍हला लिहिलेल्या पत्रात म्‍हटले आहे. सर्व पुराव्यांनिशी अमरावती विभागीय कार्यालयात प्रकरण दाखल केले असून, माझ्यावरील आरोप फोल ठरतील आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा विश्वासही श्री. लोंढे यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: