बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

अशाने कसा जाणार कोरोना?; बुलडाण्यात अनेक दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली!; नियम सर्वांना लागू नाहीत का? बाकीच्‍या दुकानदारांचा सवाल!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यात 81 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळल्याची वार्ता सकाळीच धडकली. गेल्या काही दिवसांपासून सातत्‍याने शहरातील कोरोना रुग्‍णसंख्या वाढत आहे. असे असताना शहरवासियांनी काही दिवस का होईना अधिक गांभीर्याने वागण्याची गरज आहे. तरच हे कोरोनाचे संकट दूर होऊ शकते. पण काही बेफिकीर नागरिकांना अजिबात त्‍याचे गांभीर्य नाही. आज शहरातील बुलडाणा लाइव्‍हने पाहणी केली असता सर्वच बेफिकीरीचा कारभार नजरेस पडला. गेल्या काही दिवसांत प्रशासनाने अनेक दुकानदारांना दंड ठोठावला आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चोप आणि सोबत दंडही बसला आहे. असे असतानाही कायदा पायदळी तुडविण्यात अनेकांना धन्यता वाटतेय की काय, असाच प्रश्न उभा राहतो.

सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू राहतील, असे आदेश असतानाही सकाळपासून शहरात बऱ्याच ठिकाणी अन्य दुकानेही उघडी असल्याचे दिसत होते. शहरातील चिखली रोड, जांभरून रोड या परिसरात कपड्यांची दुकाने, हार्डवेअरची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, भांड्यांची दुकाने, झेरॉक्सची दुकानेसुद्धा सुरू असल्याचे बुलडाणा लाइव्हने केलेल्या पाहणीत समोर आले. यातील काही दुकाने अगदी बिनधास्त तर काही अर्धे शटर उघडे ठेवून सुरू होती. आता दुकाने सुरू आहे म्‍हटल्‍यावर ग्राहकही येणार. त्‍यामुळे लॉकडाऊन लाऊन तरी काय फायदा, असा प्रश्न उपस्‍थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने केवळ जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानाकरिताच दुपारी 3 पर्यंतची परवानगी दिली असली तर दुकानदारांपर्यंत हा संदेश व्यवस्थित पोहचला नाही की जाणूनबुजून नियमांची पायमल्ली सुरू आहे, हे या दुकानदारांनाच माहीत.

अनेक दुकानदारांची बुलडाणा लाइव्‍हकडे तक्रार

बुलडाणा लाइव्‍हकडे सकाळीच काही दुकानदारांच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्या. त्‍यांच्‍या म्‍हणण्यानुसार, नियम सर्वांसाठीच हवेत. आम्‍ही दुकाने बंद ठेवायची आणि काही लोकांनी चालू ठेवली तरी त्‍यांच्‍यावर कारवाई होणार नसेल तर कशासाठी आम्‍ही तरी बंद ठेवायची? आमचेही दुकानावरच पोटपाणी आहे. असा भेदभाव प्रशासनाने करू नये, अशी तक्रार त्‍यांनी केली. त्‍यानंतर बुलडाणा लाइव्‍हने केलेल्या पाहणीत धक्‍कादायक चित्र दिसून आले आणि कोरोना का काही केल्या थांबत नाही, याचेही कारण यानिमित्ताने समोर आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: