बुलडाणा (घाटावर)

आंदोलन, उपोषणांनी गजबजले जिल्हाधिकारी कार्यालय!; वाचा कोण, कशासाठी करतंय आंदोलन…

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण, आंदोलन करण्यात येत असून, आंदोलनांनी जिल्हाधिकारी कार्यालय काल आणि आज, 27 जानेवारीलाही गजबजल्याचे दिसून आले. दुसरा दिवस उजाडूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली.
कोविड कंत्राटी कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण सुरू
जिल्ह्यातील बंद पडत असलेल्या 14 कोविड केअर केंद्रांतील कंत्राटी कर्मचार्‍यांचे कायमस्वरूपी इतरत्र समायोजन करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. उपोषणात कोविड कंत्राटी कर्मचारी दीपाली लहाने, आम्रपाली इंगळे, गणेश बरकले, प्रकाश डोंगरे यांनी सहभाग घेतला.
शेषराव चव्हाण यांचे उपोषण
हाताने दगड फोडून वाहतूक करण्याकरिता शासकीय जमिन क्षेत्र आराखड्यात समाविष्ठ करून परवानगी मिळण्यासाठी शेषराव तुकाराम चव्हाण (रा. सुंदरखेड, ता. बुलडाणा) उपोषणाला बसले आहेत.


रिपाइं युवक आघाडीचे उपोषण
जिल्हा अन्न व औषधी प्रशासन कार्यालयातील अधिकारी केदार, सोळंके यांच्या अवैध संपत्तीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्वरित कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. 26 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणात जिल्हाअध्यक्ष विजय साबळे यांच्यासह सुनील सुदाम आराख, अशोक दगडू मोरे, समाधान हिवाळे, केशव सरकटे, अमोल गवई, आकाश जाधव आदींनी सहभाग घेतला आहे.
मोताळ्याच्या मत्स्य व्यावसायिकाचे उपोषण
खेडी कोर्‍हाळा (ता. मोताळा) येथील जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील मत्स्य व्यवसायासाठी घेतलेल्या तलावावर आणलेली स्थगिती उठविण्यात यावी, या मागणीसाठी मोताळा येथील मत्स्य व्यावसायिक पुंजाजी सिताराम तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करायला सुरुवात केली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: