बुलडाणा (घाटावर)

आजवर दीडेक लाख भाविकांची मांदियाळी अन्‌ आता शुकशुकाट… प्रति शेगाव येळगाववासीयांनी अनुभवला टोकाचे चित्र

बुलडाणा (संजय मोहिते : विशेष प्रतिनिधी) : शेगावीच्या राणावर गाढ श्रद्धा असलेल्या बुलडाणा नजीकच्या येळगाव येथील काही भाविकांनी निर्धार, निश्चय व नियोजन करून सुमारे 24 वर्षांपूर्वी गजानन माऊलींच्या मंदिराची पायाभरणी केली. यानंतर जिद्दीने शेगावच्या मंदिराची मिनी प्रतिकृती उभारत भव्य परिसर साकारला . यामुळे आता धरण सोबतच माऊलींच्या मंदिरासाठी देखील हे गाव ओळखले जाते. अशा या गावात यंदाच्या प्रकटदिनी शुकशुकाट व भाविकांची तुरळक गर्दी दिसून आली. यामुळे पदाधिकारी हजारो भाविक हळहळले. त्यांच्या बोलण्यावागण्यातून त्यांची खंत दिसून आली.


बुलडाण्याचे उपनगर ठरलेल्या येळगावात प्रकट दिना निमित्त 3 दिवस विविध कार्यक्रम रंगतात. 3 दिवस असणारे कीर्तन, दिंडी सोहळा, शेवटच्या दिवशी होणारे काल्याचे कीर्तन अन्‌ मोकळ्या शेतात तासन् तास चालणारा महाप्रसाद सोहळा आणि अहोरात्र दर्शनासाठी दुरदुरुन येणारे असे मिळून या 3 दिवसांत दीडेक लाख भाविक हजेरी लावत आले असल्याची माहिती उपाध्यक्ष शंकर महाराज येळगावकर व सचिव राम महाराज चौधरी यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. या तुलनेत यंदा कोरोना प्रकोपमुळे भाविकांचा शुकशुकाट दिसून आला. यामुळे आमच्याच नव्हे तर सर्व संचालक, भाविक गावकरी यांच्या मनाला वेदना झाल्याचे त्यांनी गहिवरल्या स्वरात सांगितले. पुढील वर्षी मंदिराचा रौप्य महोत्सवी सोहळा आहे. त्यासाठी अध्यक्ष उत्तम काकडे, सहसचिव पंडित गव्हाळे, कोषाध्यक्ष बाबुराव मानमोडे व संचालकांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येणार आहे, असे यावेळी उपस्थित कळमकर गुरुजींनी सांगितले. महाराजांनी भक्तांची संकटे, आपत्ती दूर केल्या, कोरोना पण घेऊन जातील, असा आशावाद बोलून दाखवीत हे शेगावीच्या गजानना | महासंता आनंदघना | तुला येऊ दे काही करुणा!! या शब्दांत शंकर महाराजांनी मंदिर परिसरात प्रकटदिनी संध्यासमयी रंगलेल्या अनौपचारिक चर्चेला विराम दिला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: