बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

आता जिल्ह्यातील सर्वच शहरे कंटेन्मेंट झोन! रात्री कडक संचारबंदी!! अत्यावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 3 पर्यंतच; सैलानी महायात्रा रद्द

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 5 शहरे कंटेन्मेंट झोन घोषित करण्याला 1 दिवस उलटत नाही तोच उर्वरित 8 शहरांना देखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज, 23 फेब्रुवारीला यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. या नगरांतही अत्यावश्यक दुकाने 3 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा असून, डेअरी 2 टप्प्यांत राहणार आहे. रात्री 8.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. प्रारंभी बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर व देऊळगावराजा या शहरांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. यानंतर आज मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, जळगाव, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मोताळा या नागरी भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले.

असे राहणार निर्बंध व मुभा

  • जीवनाश्यक साहित्‍याची दुकाने, किराणा, भाजीपाला, औषधी दुकाने, रेशन दुकान, पीठ गिरण्या सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू
  • दूध विक्रेते व वितरण केंद्र सकाळी 6 दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेडारम्यान सुरू.
  • या क्षेत्रात रात्री 8.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार.
  • क्षेत्रातील सर्व उद्योग सुरू राहणार. अत्यावश्यक सेवेतील विभाग वगळून इतर कार्यालयांत 15 टक्के कर्मचारी राहणार उपस्थित.
  • हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा.
  • तहसीलदाराच्या परवानगीने लग्न व वधूवर सह 25 जणांना मंजुरी.
  • मालवाहतूक सुरूच राहणार.
  • भाजीपालाची हर्रासी पहाटे 3 ते सकाळी 6 वाजेदरम्यान. फक्त किरकोळ विक्रेत्यांनाच हजर राहता येणार. या क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील.
  • सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत.

सैलानी यात्रा रद्द
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता पुढील महिन्यात भरणारी सैलानी महायात्रा रद्द करण्यात आली आहे. यासाठी देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांना जिल्ह्याच्या सीमेवरच रोखण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी आहे. जिल्ह्यातील 13 तालुका स्थळे (नगर पालिका क्षेत्र) कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातही कोविडचा उद्रेक वाढत आहे. तसेच या यात्रेला राज्यच नव्हे देशभरातून लाखो भाविक किमान 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत येतात, ही बाब लक्षात घेता 25 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान भरणारी सैलानी महा यात्रा स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज आदेश जारी केले. जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट लावून भाविकांना पिपळगाव सराई ( ता, बुलडाणा) येथे येण्यास रोखण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना देण्यात आले आहेत.

बुलडाण्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु; रस्त्यावर शुकशुकाट
बुलडाण्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी तीनपर्यंत सुरू होती. 3 नंतर सर्व दुकाने बंद करण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. आज सकाळी काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडे करून दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी दुकाने बंद केली. हॉटेल आणि उपहारगृह व्यावसायिकांनी आता फक्त पार्सल सुविधा सुरू केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन ची घोषणा केलेली असली तरी हे लॉकडाऊन आणखी वाढू न देणे हे मात्र पूर्णपणे जनतेच्या हातात आहे.

रूट मार्चद्वारे बुलडाणा शहरात लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन


आज 23 फेब्रुवारी रोजी बुलडाणा शहरात पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन रूट मार्च काढण्यात आला. प्रमुख रस्त्यांवरून हा रूट मार्च निघाला. लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतन पालन करावे, सॅनिटायझर,मास्कचा नियमित वापर करावा. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन या रूट मार्चच्या माध्यमातून करण्यात आले. याशिवाय 22 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान चे लॉकडाऊन नेमके कसे असेल यासंदर्भातल्या सूचनांची घोषणा सुद्धा पोलिसांच्या वाहनावरून करण्यात आली.
या रूट मार्च मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे, शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्यासह पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या सहभाग होता.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: