क्राईम डायरीमुख्य बातम्या

आधी हाकलून दिले, आता मुलांच्‍या शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रेही देईनात… विवाहितेची पतीविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरातून हाकलून दिल्यानंतर निराधार झालेल्या विवाहितेला मुलांच्‍या शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रेही देण्यास नकार देणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी काल, 1 जुलैला गुन्‍हा दाखल केला आहे.

प्रतिभा अशोक वरकडे (35, रा. धरणगाव, ता. मलकापूर, ह. मु. रा. हतेडी बुद्रूक ता. बुलडाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. तिचा पती अशोक किसन वरकडे (45), जेठ रमेश किसन वरकडे (50, दोघे रा. धरणगाव), गणेश किसन वरकडे (48, रा. चिखली), नंदा रमेश वरकडे (45), विशाल रमेश वरकडे (23), संदीप रमेश वरकडे (28), निखिल रमेश वरकडे (26, सर्व रा. धरणगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

2004 साली प्रतिभाचे लग्‍न अशोकसोबत हतेडी येथे झाले होते. त्‍यांना दोन अपत्य आहेत. लग्‍न झाल्‍यापासूनच पती तिचा शारीरिक, मानसिक छळ करत होता. दारू पिऊन येत शिविगाळ करत होता. अनेकदा त्‍याने तिला घरातून हाकलून दिले. पतीला त्‍याचा भाऊ व घरातील अन्य मंडळींनी त्रास देण्यासाठी व मारहाण करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे. 2014 साली घरातून मारहाण करून हाकलून देण्यात आले तेव्‍हापासून ती आईच्‍या आश्रयाने राहत आहे. मात्र मुलांच्‍या शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र, कुटुंब प्रमाणपत्र, रेशनकार्ड, वडिलांचा जन्म दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने तिने या कागदपत्रांची मागणी पतीकडे केली तर त्‍याने तिला अर्वाच्‍च्‍य भाषेत बोलून कागदपत्रे देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी पतीसह सासरच्या अन्य मंडळीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: