जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

आमदार श्वेताताई महालेंच्‍या प्रयत्‍नामुळे वाचले रुग्‍णाचे प्राण !; एका कॉलवर ‘अशी’ घेतली दखल

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखलीच्‍या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची सहृदयता सर्वश्रुत आहे. कार्यकर्त्यांसाठी अगदी ‘काहीही अन्‌ कुठेही…’ अशी भूमिका ठेवणाऱ्या श्वेताताई नागरिकांप्रतीही तेवढ्याच जागरूक असल्याचा प्रत्‍यय काल, 23 एप्रिलला आला. साखळी बुद्रूक (ता. बुलडाणा) येथील 52 वर्षीय कोरोनाग्रस्‍ताची प्रकृती अत्‍यंत बिघडली होती. खासगी रुग्‍णालयात झेपवेल तितका खर्च कुटुंबियांनी केला, पण पैसे संपल्याने पुढे काय, सरकारी रुग्‍णालयात तर बेडही  उपलब्‍ध नव्‍हता… अशा स्‍थितीत देवदूत बनूनच जणू श्वेताताई धावल्या आणि रात्री उशिरा या रुग्‍णाला शासकीय कोविड रुग्‍णालयात बेड अन्‌ व्‍हेंटिलेटर उपलब्‍ध झाले.

सध्या जिल्ह्यात कोरोनाची स्‍थिती अत्‍यंत बिकट झाली आहे. हजारावर रुग्‍ण, त्‍यातले अर्ध्याअधिक रुग्‍णांची प्रकृती गंभीर, अपुरे बेड-ऑक्सिजन सिलिंडर आणि त्‍यामुळे घायकुतीला आलेली यंत्रणा असे विदारक चित्र आजघडीला बघायला मिळते. उपाययोजना करूनही कोरोना आटोक्‍यात येण्याऐवजी वाढतच असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. तरीही आपापल्या परीने सारेच कोरोनाविरुद्धची ही लढाई लढताना दिसत आहेत. यात लोकप्रतिनिधीही सध्या आपापल्या मतदारसंघातील नागरिकांची ‘काळजी’  घेण्यात व्‍यस्‍त आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्‍यांचे दूरध्वनी मदतीसाठीचे फोन घेण्यात आणि त्‍यांची मदत करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या कॉल्समध्येच व्‍यस्‍त असतात. यात आघाडीवर दिसतात त्‍या चिखलीच्‍या आमदार श्वेताताई. तसेही कायकर्ता असो की मतदारसंघातील सामान्य नागरिक, त्‍यांना तत्‍पतेने मदत करण्यात श्वेताताई पुढे असतात, हे वारंवार दिसून आले आहे, तसेच ते कालही दिसून आले…

साखळी बुद्रूक येथील 52 वर्षीय व्‍यक्‍तीला कोरोना झाल्‍याने बुलडाण्यातील एका खासगी रुग्‍णालयात दाखल केले होते. बिल वाढत चालले, पण तब्‍येतीत काही फरक पडताना दिसत नव्‍हता. कुटुंबियांकडील पैसे संपले. सरकारी रुग्‍णालयात नातेवाइकांनी चकरा मारल्या, पण व्‍हेंटिलेटरची सुविधा असलेला बेड उपलब्‍ध नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे रुग्‍णाची बिकट होत चाललेली स्‍थिती अन्‌ दुसरीकडे आर्थिक संकट अशा द्विधा मनःस्‍थितीत अडकलेल्या कुटुंबियांनी भाजपा ओबीसी मोर्चाच्‍या प्रदेश सचिव सौ. शालिनीताई बुंधे- चौथनकर यांना संपर्क केला. सौ. शालिनीताईंनी लगेच ही बाब आमदार सौ. श्वेताताईंच्‍या कानावर घातली. श्वेताताईंनी रुग्‍णाबद्दल माहिती घेऊन तातडीने शासकीय कोविड रुग्‍णालयात व्‍हेंटिलेटरची सुविधा असलेला बेड उपलब्‍ध करून देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. त्‍यानंतर अवघ्या काही तासांत रुग्‍णाच्‍या नातेवाइकांना कळवून रुग्‍ण  कोविड सेंटरमध्ये नेण्यास ताईंनी सांगितले. रात्री उशिरा या रुग्‍णाला तिथे बेड उपलब्‍ध झाला. सध्या त्‍यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्‍या संकटकाळात सध्या सर्वाधिक सक्रीयता आमदार सौ. श्वेताताई महाले यांचीच दिसून येत आहे. ऑक्सिजन जिल्ह्याला उपलब्‍ध करून देण्यासाठी  घेतलेला पुढाकार असो, की रुग्‍णांची मदत करणे, अगदी जिल्ह्याची चुकीची आकडेवारी प्रशासनाकडून राज्‍याला कळवली जात असल्याने त्‍यावरही ताईंनी आक्षेप घेऊन चौकशीची मागणी केली. यावरून एकाचवेळी एवढ्या सर्व पातळ्यांवर काम करणाऱ्या आमदार पहिल्यांदाच पाहिल्या जात आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: