बुलडाणा (घाटावर)

आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्‍नाने जिल्ह्याला मिळाले 85 ऑक्सिजन सिलिंडर!

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी चिखली येथे एकही ऑक्सिजन सिलिंडर नसल्याची गंभीर बाब आमदार सौ. श्वेताताई महाले यांना कळताच त्यांनी तातडीने बीड आणि जालना येथील ऑक्सिजन प्लांटसोबत बोलून चिखली आणि बुलडाणा शहरातील खासगी डॉक्टरांसाठी 85 ऑक्सिजन सिलिंडर मिळवून दिल्याने किमान दोन दिवसांचा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला. त्‍यामुळे रुग्णांसोबतच डॉक्टरांनीसुद्धा सुटकेचा श्वास सोडला आहे. मिळालेल्या 85 ऑक्सिजन सिलिंडरपैकी 45 सिलिंडर बुलडाणा येथे 18 एप्रिलच्या तर उर्वरित 40 सिलिंडरची खेप 19 एप्रिलच्या सकाळी चिखली येथे पोहोचली आहे.

चिखलीसाठी ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणार नाही अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली . त्यामुळे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील या अतिशय अस्वस्थ झाल्या. त्यांनी बीड, जालना व राज्यातील इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन प्लांटचे नंबर घेऊन त्यांच्याशी बोलून चिखली शहरात एकही सिलिंडर नसल्याने अनेक रुग्णांचे जीव जातील व अनेकांचे हाल होतील ही विदारकता ऑक्सिजन प्लांटच्या व्यवस्थापनासमोर मांडली. परंतु अनेक ऑक्सिजन प्लांटवाल्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांनी सिलिंडर देण्यास असमर्थता दर्शविली. परंतु बीड आणि जालना येथून ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आश्वासन तेथील प्लांटने दिले. परंतु त्यासाठी त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या पत्राची मागणी केली. त्यामुळे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली ऑक्सिजन पुरवठा नोडल अधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांच्‍या ही बाब निदर्शनास आणून दिली. अधिकाऱ्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता चिखलीसाठी पत्र देण्याची हमी दिली. सोबतच उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी आमदार सौ श्वेताताई महाले यांच्याकडे बुलडाणा शहरातसुद्धा ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याचे सांगून बुलडाणा शहरासाठी सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीप्रमाणे आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी बीड व जालना येथील प्लांट व्यवस्थापना सोबत विनंती करून बुलडाणा शहरासाठी सुद्धा सिलेंडर देण्याची मागणी केली. त्यांनी त्यांच्या मागणीवरून सिलिंडर देण्याचे कबूल केले. उपजिल्हाधिकारी अहिरे व तहसीलदार चिखली यांनी तातडीने पत्र देऊन बीड व जालना येथे गाडी पाठवली. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बुलडाणा येथे 45 तर चिखली येथे 40 ऑक्सिजन सिलिंडर प्राप्त झाली आहेत.

व्यवस्थेत प्राण फुंकण्याची गरज  ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील

राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सरकारचे अपयश समोर आणणाऱ्या विरोधी पक्षांनाच टार्गेट करून प्रत्येक गोष्टीकरिता केंद्राकडे बोट दाखवून आपला निष्क्रिय कारभार झाकण्याचा प्रयत्‍न केला जात आहे. स्वतः ही करायचे नाही आणि इतरांनाही प्रयत्न करून परिस्थिती सुधारू द्यायची नाही. चुका दाखविल्यास त्यांनाच टार्गेट करायचे असा प्रकार सत्ताधारी करीत आहे. सत्ताधारी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी काय करतात हे सांगण्यापेक्षा विरोधी काय करत आहे हेच सांगण्यात त्यांचा वेळ जात आहे आणि राज्यातील जनतेचा प्राण जात आहे. त्यामुळे सर्व व्यवस्था खिळखिळी झालेली असून रुग्णांना तर प्राणवायू हवाच सद्यःस्थितीत असणाऱ्या व्यवस्थेतही प्राण फुंकण्याची गरज असल्याचा घणाघात आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी यावेळी केला. सोबतच प्रशासनाचे सहकार्याने बुलडाणा जिल्ह्याला लागणारा ऑक्सिजन सातत्याने मिळवून देण्यासाठी यापुढेही प्रयत्न करतच राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: