बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोळ? परीक्षा स्टाफ नर्सची पेपर अग्निशामक दलाचा!; बुलडाण्यातील उमेदवारांचा खळबळजनक आरोप

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 28 फेब्रुवारीला राज्यभरात आरोग्य विभागातर्फे भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा प्रकियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार  झाले असून, त्यामुळे प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात  यावी अशी मागणी परीक्षार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्यभर विविध गट क पदांच्या परीक्षा झाल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही परीक्षा पारदर्शी होईल असे म्हटले होते मात्र ही परीक्षा  अपारदर्शी झाल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे. परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी. तसेच परीक्षेत गैरप्रकार होण्यासाठी जबाबदार  असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची  मागणी त्‍यांनी केली आहे.

परीक्षार्थ्यांचे आरोप

  • नागपूरातील एका सेंटरवर परीक्षा देण्यासाठी गेलेला बुलडाण्यातील उमेदवाराची स्टाफ नर्सची परीक्षा होती मात्र त्याला आलेला पेपर हा पूर्णपणे अभ्यासक्रमाच्या बाहेरचा होता. त्याला अग्निशामक दलाचा पेपर देण्यात आला होता.
  • नाशिक येथील परीक्षा केंद्रावर 1900 उमेदवार परीक्षा देणारे असताना प्रत्यक्षात मात्र 1000 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे एका बाकावर 2-3उमेदवारांना बसावे लागले.
  • परीक्षार्थीची ओळख पटेल असे कोणतेही लिखाण  उत्तरपत्रिकेवर नमूद करता येत नाही असे असताना या परीक्षेत मात्र उमेदवारांच्या संपूर्ण नावासह इतर ओळख पटविणारा तपशील नमूद करवून घेण्यात आला.

एक्सरे टेक्निशियन पदासाठी गेवराई येथील तांडा सेंटरवर परीक्षा दिली. परीक्षेची वेळ दुपारी 3 वाजेची असताना प्रत्यक्षात 4:30 वाजता पेपर हातात देण्यात आला. कारण विचारले असतांना पेपर घेऊन येणारा ड्रायव्हर जेवणासाठी थांबल्याने उशिर झाल्याचे सांगण्यात आले.

-नीलेश हिवाळे,विद्यार्थी चिखली

मला मिळालेले परीक्षा केंद्र बुलडाण्यातील केम्ब्रिज स्कूल होते.  परीक्षा सुरू असताना  11:30 वाजता बाहेरील काही लोक वर्गात घुसले. त्यांनी पदवीधर मतदार संघ यादीत नाव नोंदविण्यासंबंधी माहिती दिली व अर्जांचे वाटप केले. त्यामुळे परिक्षार्थींचा वेळ वाया गेला

-पंकज जाधव, विद्यार्थी बुलडाणा

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: