बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

BIG BREAKING : आली रेऽऽ… मध्यरात्री 12 च्या ठोक्याला बुलडाण्यात कोरोना लस दाखल!

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ती आली, तिने पाहिले अन् तिने जिंकले असेच काहीसे चित्र मध्यरात्री 12 च्या दरम्यान जिल्हा परिषदेत होते. आरोग्य यंत्रणेसह प्रशासनालाही आतुर प्रतीक्षा असलेल्या कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड या लसींना वाहनांचा ताफा मध्यरात्री 12 च्या ठोक्याला बुलडाणा नगरीत दाखल झाला. अकोला येथून व्हॅक्सिन व्हॅनमधून लस पोलिसांच्या संरक्षणात जिल्हा परिषद कार्यालयातील लस भांडारात आणण्यात आली. 19 हजार डोस आल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

16 जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील सात ठिकाणी ही लस नोंदणी केलेल्या 14 हजार 300 आरोग्य कर्मचार्‍यांना देण्यात येणार आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट येथून अकोला येथे कोविशिल्डचा पुरवठा झाला आहे. तेथून बुलडाणा जिल्ह्यासाठी मंजूर 19 हजार डोसचा साठा घेण्यासाठी आरोग्य विभागाची विशेष व्हॅन बुधवारी दुपारीच अकोल्याकडे रवाना झाली होती. ही व्हॅन व सोबतची वाहने बरोबर 12 च्या ठोक्याला जिल्हा परिषदेत दाखल झाली.

बहुप्रतिक्षित कोविशिल्डचे थंडगार स्वागत करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी सज्ज होतेे. झेडपीमध्ये 0 डिग्री सेल्सियसपेक्षा कितीतरी कमी अर्थात उणे तापमानात ही लस साठविण्यासाठी शितलीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय, मलकापूर, शेगाव, खामगाव सामान्य रुग्णालय, चिखली, देऊळगावराजा व मेहकर ग्रामीण रुग्णालय या 7 लसीकरण केंद्रांपर्यंत डोस पोहोचविण्यात येणार आहेत.

लसीला विशिष्ट तापमानात ठेवणे अत्यावश्यक असल्याने यंत्रणांना वाहतूक व साठवण करताना कमालीची दक्षता बाळगावी लागणार आहे. तापमानात फरक पडला की लसीचा रंग बदलतो, असे जाणकारांनी सांगितले. साठवणुकीदरम्यान तांत्रिक व मानवीय चुकीमुळे तापमानात बदल झाला तर लगेच स्थानीय अधिकार्‍यांनाच नव्हे वरिष्ठ पातळीवर सुद्धा अलर्ट करण्याच्या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: