खामगाव (घाटाखाली)मुख्य बातम्या

आ. गायकवाडांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्‍हा दाखल!; सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज तद्दन खोटा!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आमदार संजय गायकवाड यांच्‍याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा दाखल झाला, स्वतः एसपींनी गुन्‍हा दाखल केला… अशा स्वरुपाच्‍या अफवा दुपारपासून सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र त्‍या तद्दन खोट्या असून, आ. गायकवाड यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झालेला असला तरी तो ॲट्रॉसिटीचा नसून, आपत्ती व्यवस्‍थापन कायद्याचा भंग झाला म्‍हणून दाखल करण्यात आलेला आहे. सध्या कोरोनाची साथ असल्याने गायकवाडांनी ज्‍या पद्धतीने गावात गर्दी जमवली आणि त्‍यामुळे कोरोना पसरण्यास मदत झाली यामुळे त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे.

३० जूनला आ. गायकवाड यांनी चितोडा (ता. खामगाव) गावात भेट दिली होती. यावेळी त्‍यांच्‍याकडून आपत्ती व्यवस्‍थापन कायद्याचा भंग झाला. यामुळे त्यांच्यासह दोन डझन कार्यकर्त्यांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. गायकवाडांसोबत शेकडो कार्यकर्ते, ग्रामस्‍थ होते. यावेळी ग्रामस्‍थांना उद्देशून गायकवाडांनी खोटी ॲट्रॉसिटी कुणी तुमच्‍याविरुद्ध दाखल करत असेल तर तुम्‍ही दरोड्याचे गुन्‍हे दाखल करा, असा सल्ला दिला होता. त्‍यामुळे दोन कुटुंबातील या वादाला राजकीय वळण लागले होते. हा वाद वाढू लागताच कालच स्वतः कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी चितोडा येथे भेट दिली. त्‍यांनी ग्रामस्‍थांची सभा घेऊन शांततेचे आवाहन केले. लाेकांच्‍या भडकावण्याकडे लक्ष देऊ नका. गुण्या गोविंदाने राहा, असेही ते यावेळी म्‍हणाले होते. त्‍यामुळे गावातील तणाव बराचसा निवळला आहे. कायदा सर्वांना समान आहे. निरपराध लोकांना शिक्षा होणार नाही. मात्र दोषींना सोडणार नाही, असा इशाराही त्‍यांनी दिला होता. त्‍याचे प्रत्‍यंतर लगेचच आज दिसून आले. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आ. गायकवाड यांच्‍याविरुद्ध गावात गर्दी जमवून कोरोनाला दिलेल्या आव्हानामुळे गुन्‍हा दाखल झाला आहे. त्‍यांच्‍यासह गजेंद्र दांदडे, मुन्‍ना बेंडवाल, ओमसिंह राजपूत, जीवन उबरहंडे, कुणाल गायकवाड, अनुप श्रीवास्तव, भोजराज पाटील, श्रीकृष्ण शिंदे, नितीन राजपूत, ज्ञानेश्वर वाघ आणि ८० ते ९० जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे.

केदारे यांच्‍याविरुद्धही गुन्‍हा

चितोडा येथे ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदारे यांनीही कार्यकर्त्यांसह गर्दी जमवली होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍यासह धम्मपाल नितनवरे, अतुल इंगळे, नीलेश वानखेडे आणि १५ ते २० जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

एसपी श्री. चावरिया म्‍हणाले…
बुलडाणा लाइव्हने पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, की आ. गायकवाड यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र त्यावर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येईल. अद्याप त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला नाही, असा निर्वाळा त्‍यांनी दिला.

अफवांचा बाजार रोखा…
सध्या अफवांचा बाजार मोठ्या प्रमाणावर पसरवला जात आहे. त्‍यामुळे वाचकांनी अफवांवर विश्वास न ठेवता बुलडाणा लाइव्‍हच्‍या बातमीची प्रतीक्षा करावी. आम्‍ही प्रत्‍येक घटनेची शहनिशा करूनच बातमी कायम प्रसिद्ध करत राहू. – टीम बुलडाणा लाईव्‍ह

आमदार गायकवाड यांची आमदारकी रद्द करा; बुलडाण्यात विविध संघटनांची राज्यपालांकडे मागणी
आ. संजय गायकवाड यांनी चितोडा येथे केलेले येथे केलेले कृत्य बेकायदेशीर असून, गंभीर स्वरुपाचा अपराध आहे. त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट तथा आर्म ॲक्टनुसार गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी. संविधानाची शपथ घेऊन निःपक्ष राहण्याची प्रतिज्ञा मोडीत काढल्याबद्दल आ. गायकवाड यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन विविध संघटनांनी राज्यपालांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायकवाडांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी समतेचे निळे वादळ संघटनेचे अशांत वानखेडे, भूमी मुक्ती मोर्चाचे प्रविण अंभोरे, दलित पँथरचे सोमचंद दाभाडे, भीम आर्मीचे सिद्धार्थ वानखेडे, अरविंद डोंबरे,सम्राट अशोक संघटनेचे आशिष खरात यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: