क्राईम डायरीमुख्य बातम्या

उंद्रीच्या लेकीला लाख रुपयांसाठी मारहाण करून घराबाहेर हाकलले!; सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्लॉट घेण्यासाठी एक लाख रुपये आण तेव्हाच घरात ये, असे म्हणून विवाहितेला तिच्‍या दोन चिमुकल्यांसह घराबाहेर काढले. तेव्हापासून ती माहेरी उंद्री येथे राहते. ७ जुलै रोजी तिने सासरच्या मंडळीविरोधात अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. कविता चिंतामण फतपुरे (३०) असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. कविताचे लग्न डोंगरखंडाळा ता. बुलडाणा येथील चिंतामण ईश्वर फतपुरे (३२) याच्यासोबत २०११ मध्ये झाले होते. त्यांना ९ वर्षांचा ओम आणि ७ वर्षांची मुलगी अनन्या अशी अपत्य आहेत. लग्नानंतर ते रांजणगाव (ता. जि. औरंगाबाद) येथे राहायला गेले. कविताने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस तिला पती, सासू, सासऱ्यांनी चांगले वागवले. नंतर पतीच्या वागण्यात बदल झाला. तो तिला शिविगाळ व मारहाण करू लागला. प्लॉट घेण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सासरची मंडळी करत होती. त्यासाठी तिला अनेकदा उपाशी ठेवले.

सहा महिन्यांपूर्वी ३० जानेवारी २०२१ रोजी प्लॉट घेण्यासाठी १ लाख रुपये घेऊन ये, नाही आणले तर जीवाने मारून टाकीन, अशी धमकी देत तिला मुलाबाळांसह रस्त्यावर हाकलून दिले. हवालदिल विवाहिता लेकरांना घेऊन माहेरी आली. या घटनेबाबत तिने चिखलीच्‍या महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार दिली होती. मात्र पती, सासू, सासरे व नंदई हे चिखली येथे तारखेवर हजर झाले नाहीत. त्‍यामुळे तिने ७ जुलै रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून तिचा पती चिंतामण ईश्वर फतपुरे, सासू अनुसया ईश्वर फतपुरे, दीर दशरथ ईश्वर फतपुरे, जाऊ आशा दशरथ फतपुरे (सर्व रा. डोंगरखंडाळा ह.मु. रांजणगाव ता. औरंगाबाद), नणंद लक्ष्मी तुळशीदास पसरटे (रा. सातगाव म्हसला, ता. जि. बुलडाणा), नणंद कुसुम देवसिंग ब्राह्मणे व नंदई देवसिंग लक्ष्मण ब्राह्मणे (रा. हिंगणा गव्हाड, ता. नांदुरा जि. बुलडाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: