बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बुलडाणा जिल्हावासियांनो, कोरोना लस घ्यायची? मग ‘हे’ वाचा….

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. यात 60 वर्षांपेक्षा जास्त व्यक्‍तींनाही लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी सध्या 4 खासगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली असून, दोन डोससाठी खासगी रुग्णालयात 500 रुपये आकारणी केली जाणार आहे. उद्या, 2 मार्चपासून लसीकरणासाठी कोविन, आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी सुरू आहे, अशी माहिती जिल्‍हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिली.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाची माहिती देण्यासाठी आज, 1 मार्चला पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. सावके उपस्थित होते. लसीकरणासाठी COWIN, AAROGYA SETU या ॲपवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे https:// selfregistration.cowin.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी या ॲप, संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्राच्या ठिकाणीसुद्धा नोंदणी सुरू राहणार आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. या संदेशामध्ये लसीकरण सत्राचे ठिकाण, दिनांक व वेळ याची माहिती देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 13 शासकीय रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालय आहे. या ठिकाणी विनामूल्य लसीकरण करण्यात येणार आहे, तर अमृत हृदयालय व मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा, कोलते हॉस्पीटल मलकापूर व कोठारी हॉस्पीटल चिखली या चार खासगी रुग्णालयांमध्ये दोन डोससाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. भविष्यात आणखी हॉस्पीटल यामध्ये जोडण्यात येणार आहे. एक डोस 250 रुपयांना मिळणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणीसुद्धा लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एका लसीकरण केंद्राला 100 व्यक्तींचे दैनंदिन उद्दिष्ट असणार आहे. त्याचप्रमाणे 45 ते 60 वर्षादरम्यान असलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींनासुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 3615 बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 15930 जणांनी लस टोचून घेतली आहे.
स्त्री रुग्णालय परिसरात लिक्वीड ऑक्सीजन टँकमध्ये 20 किलोलीटर ऑक्सीजनची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी ऑक्सीजनची निर्मितीसुद्धा करण्यात येणार आहे. सध्या यंत्रणेकडे जंबो, टेरा सिलिंडर उपलब्ध आहेत. त्यामुळे रूग्णांची ऑक्सीजनची मागणी पूर्ण करण्यात येत आहे.

खासगी रुग्णालयांनी जास्तीचे शुल्क आकारले तर…
लसीकरणासाठी 250 रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक शुल्क आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या खासगी हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्या रुग्णालयाचे लायसन्स सुद्धा रद्द केले जाऊ शकते, असा इशाराही जिल्हधिकाऱ्यांनी दिला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: