जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कन्फर्म! मुकुल वासनिक “बुलडाणा लाइव्ह’ला म्‍हणाले, हो येणार मी १९-२० जुलैला!; “जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेन पुन्‍हा पकडला जोर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येणार येणार… अशी केवळ चर्चा पसरायची… प्रत्‍यक्षात जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक काही यायचेच नाहीत… गेल्या महिन्यात अगदी दौराही फिक्‍स झाला होता आणि त्‍यांच्‍या स्वागताची तयारीही करण्यात आली होती. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे त्‍यांचा दौरा रद्द झाला होता. मात्र या महिन्यात १९, २० तारखेला श्री. वासनिक कन्‍फर्म येणार आहेत. बुलडाणा लाइव्हशी बोलताना त्‍यांनी दौरा कन्‍फर्म असल्याचे सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक यांचा जिल्हा दौरा अखेर पुन्‍हा एकदा ठरला आहे. १९ जुलैला श्री. वासनिक जिल्ह्यात दाखल होणार असून, 20 जुलैच्या दुपारपर्यंत ते जिल्ह्यात थांबणार आहेत. त्‍यांच्‍या या दौऱ्याबरोबरच पुन्‍हा एकदा जिल्हाध्यक्ष बदलाच्‍या चर्चेने जोर पकडला आहे. जिल्हा काँग्रेसने वासनिकांच्‍या दौऱ्याचे वेळापत्रकही दिले आहेत. दौऱ्यात सांत्वनपर भेटी आणि चिखली येथे स्व. राजीवजी गांधी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उद्‌घाटन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यात पक्ष संघटन, कार्यकर्ता बैठक किंवा आढावा बैठक याचा समावेश नसला तरी वासनिकांच्‍या कार्यपद्धतीचे अनुभव बघता याच दौऱ्यात ते आतापर्यंतचे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हाध्यक्ष ठरणार?
सध्या चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळण्याऐवजी नव्या नेत्याला जिल्हाध्यक्ष बनवावे, अशी काँग्रेसच्या एका गटाची इच्छा आहे. संघटनात्मक दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या या पदासाठी काँग्रेसमध्येही इच्छुकांची भली मोठी रांग आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडताना वासनिकांसमोर मोठा पेच असणार आहे. दिल्लीतून जिल्हा काँग्रेसवर लक्ष ठेवून असलेल्या वासनिकांनी यासाठी स्वतःच जिल्ह्यात येण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. जिल्हाध्यक्ष बदलण्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वासनिकांचे एकमत झाल्याचे कळते. अखेर अंतिम निर्णय हा वासनिकांनाच घ्यायचा असून, त्यासाठी ते स्वतः जिल्ह्यात दाखल होत आहेत.

असा आहे दौरा
१९ जुलै २०२१
सायंकाळी ४:३० वा. सोनाळा येथे सांत्वनपर भेट
सायंकाळी ६:०० वा. जळगाव जामोद, सांत्वनपर भेट
रात्री ७:३० वा. मूर्ती येथे सांत्वनपर भेट

२० जुलै २०२१
सकाळी ९:०० वा. सावरगाव डुकरे (मा. आ. बाबुराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट).
सकाळी १०:०० वा. चिखली, स्व. राजीवजी गांधी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उद्‌घाटन कार्यक्रम.
दुपारी १२:३० वा. सिंदखेडराजा, सांत्वनपर भेट.
दुपारी १:३० वा. साखरखेर्डा, सांत्वनपर भेट.
दुपारी २:०० वा. निर्गमन.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: