बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरील नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : मंत्री उदय सामंत यांना विश्वास; आदित्य ठाकरेंनी पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सचे केले लोकार्पण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना काळात जिल्ह्यात रोज हजारच्यावर रुग्ण निघत होते. जिल्ह्याचा रुग्ण्वाढीचा आलेख सतत चढता होता. मात्र शासन, प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आपण कोरोनाची दुसरी लाटा आटोक्यात आणण्यामध्ये यशस्वी होत आहोत. तज्‍ज्ञांच्‍या मतानुसार कोविड संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज, १० जुलैला येथे केले.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्राप्त आठ व्हेंटिलेटर यंत्राचे लोकार्पण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते नियोजन भवन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, ऋषी जाधव आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, की शहरांप्रमाणेच चांगल्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागातही असल्या पाहिजेत. यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आरोग्य यंत्रणा, विविध विभाग, संस्था व नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण दुसरी लाट थोपवू शकलो. आता तिसरी लाट येऊ नये यासाठी सजग प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. उत्कृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर्स जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या यंत्रणेचा ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रूग्णांसाठी उपयोग व्हावा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. लोकार्पण सोहळ्यानंतर मंत्री महोदयांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: