बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोरोना ः ऑक्सिजन, रेमेडेसिवीरपासून भोजन अन्‌ लसीकरणाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा!; अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग जास्त आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी ऑक्सिजनची गरज असणारे रुग्णही वाढले आहेत. परिणामी जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी वाढत असून, मागणी व पुरवठ्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यंत्रणांनी ऑक्सिजन निर्मिती प्लांट तातडीने सुरू करून जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे. अन्य जिल्ह्यातून ऑक्सिजन मागण्याची वेळ येऊ देऊ नये, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात काल, 1 मे रोजी कोविड संसर्ग नियंत्रण बैठक घेण्यात आली. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. व्यासपीठावर जिल्‍हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे आदी उपस्थित होते.

रेमडेसिवीर औषधांचे वितरण आता जिल्हाधिकारी कार्यालयातून रुग्‍णालयांना होत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, की रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घ्यावा. काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. रेमडेसिवीर औषधांच्या रिकाम्या कुप्यांची योग्य विल्हेवाट लावावी. इंजेक्शन दिलेल्या रुग्णांचे नाव, हॉस्पीटलचे नाव आदींचे रेकॉर्ड ठेवावे. जेणेकरून काळाबाजार होणार नाही. रेमडेसिवीर वितरण करताना रुग्णालयातील बेडची संख्या गृहीत धरावी. घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे रेमडेसिवीर औषध येत असल्यास त्याची तपासणी करावी. औषधाचा अपव्यय होऊ देऊ नये.  घाऊक विक्रेत्यांना रेमडेसिवीर देण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करू, असेही पालकमंत्री म्‍हणाले.

हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट तातडीने सुरू करण्याबाबत सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, की ऑक्सिजन पुरवठा वेळेवर व सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करावी. पुरवठ्यामध्ये अडचणी असू नये. लिक्वीड ऑक्सिजन टँकमधून ड्युरा व जम्बो सिलिंडर भरण्यासाठीची सुविधा सुरू करावी. त्यामुळे बुलडाणा येथेच ऑक्सिजन भरला जाईल. तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात यावे. जळगाव जामोद येथील कोविड हॉस्पीटल तातडीने सुरू करावे. त्या भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळतील. ऑक्सिजन व फायर संबंधाने जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांचे ऑडीट सुरू असल्यास ते पूर्ण करावे. ऑडीटमधून काही कमतरता समोर आल्यास त्या तातडीने दूर कराव्यात. ऑक्सिजन खूप मौल्यवान त्याची बचत करावी. कुठेही ऑक्सिजन पाईप लाईनला गळती असता कमा नये.  खासगी रुग्णालयांकडून ऑक्सिजनबाबत व फायर ऑडीट झाल्याबाबत प्रमाणित करून घ्यावे. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे.  18 ते 44 वयोगटातील लसीकरणाबाबत काही विशेष योजना आखावी. जेणेकरून लसीकरण वेगाने पूर्ण होईल. लसीकरणाचा वेग वाढवावा. 18 वयाच्या पुढे जिल्ह्यातील 21 लक्ष लाभार्थ्यांना लसीकरण करावयाचे आहे. एकूण लोकसंख्येच्या 72.4 टक्के नागरिक लसीकरणाच्या टप्प्यात घ्यावयाचे आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रात विद्युत दाहिनीचा प्रस्ताव सादर करावा. सर्व नगर पालिकांना विद्युत दाहिनी देण्यात येईल. कोविड हॉस्पीटल, कोविड केअर सेंटर येथे भोजन पुरविणाऱ्या कंत्राटदारांचे देयक अदा करावे. ऑक्सिजनचे देयकही अदा करून ॲडव्हान्स द्यायचे असल्यास तर देऊन टाकावे. भोजनाचा दर्जा चांगला ठेवावा. रुग्णांच्या याबाबत तक्रारी यायला नको. जिल्ह्यातील बेडची उपलब्धता, रिक्त बेड प्रकारानुसार दाखविणारी एखादी वेबलिंक किंवा डॅश बोर्ड तयार करावा. जेणेकरून नागरिकांना बेडची परिस्थिती लक्षात येईल. रुग्णालयाबाहेरही अशाप्रकारचा डॅश बोर्ड कार्यान्वित करावा. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसलिदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील उपलब्ध बेड व सद्यःस्थिती : शासकीय व खासगी रुग्णालयातील एकूण बेड 5014. यामध्ये आयसीयू 526, वेंटिलेटर 113, ऑक्सिजन बेड 1554, सामान्य बेड 2934.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: