बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कोविडची लस घेतल्यानंतर अर्ध्या तासाने डॉ. सोनाली मुंडे म्हणाल्या, काहीच त्रास नाही!; यंत्रणेला आला हुरूप!; कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लख्ख साफ केलेला परिसर, प्रवेशद्वारी रेखाटलेली सुबक रांगोळी, मान्यवरांची उपस्थिती, सण- उत्सवासारखा माहौल अशा थाटात व दिमाखात आज, 16 जानेवारीला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दंतचिकित्सक डॉ. सोनाली मुंडे या लसीकरणच्या पहिल्या मानकरी ठरल्या.


सन 1985 पासून विविध लसीकरणाचा सर्वंकष अनुभव बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांनी आजवरच्या दीर्घ कालखंडात लसीकरणाच्या विविध मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. मात्र जीवन मृत्यूचा संघर्ष दाखविणार्‍या व देशाला विकासाच्या दृष्टीने मागे ढकलणार्‍या कोरोनावर मात करणे व लसीकरण करणे ही बाब ऐतिहासिकच ठरावी. यामुळे आज सुरू झालेल्या मोहिमेबद्दल यंत्रणेत एक आव्हानात्मक उत्सुकता होती. मात्र कठोर प्रशिक्षण, सततचा सराव अन् महा यशस्वी ड्राय रन यामुळे जिल्हा रुग्णलयच नव्हे अन्य 5 केंद्रांवरही मकरसंक्रांतसारखा उत्साहरूपी गोडवा पसरला होता. या मोहिमेत लिडिंग फ्रॉम द फ्रंट या धर्तीवर नेतृत्व करणारे सीएस डॉ. नितीन तडस, डीएचओ डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्यामुळे कर्मचार्‍यांचा आत्मविश्‍वास दुणावल्याचे चित्र दिसून आले. या मोहिमेवर बारकाईने नजर ठेवून असणारे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, आरडीसी दिनेश गीते यांच्यासह जि.प. सभापती कमलाताई जालिंदर बुधवत यांच्या उपस्थितीत मोहिमेचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले.

सीएस डॉ. तडस यांनी जिल्हाधिकारी व अतिथींना लसीकरणाची माहिती दिली. आजच्या लसीकरणसाठी 100 आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना मेसेजद्वारे याची माहिती देऊन फोन करून सूचित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येथे ऑक्सिजन, बीपी व हार्ट बिटची एकत्रित माहिती देणार्‍या मल्टी पॅरा मशीनची देखील मदत घेण्यात येत असल्याचे डॉ. तडस यांनी सांगितले. यानंतर डॉ सोनाली मुंडे यांना लस देण्यात आली. अर्धा तास विश्रांती घेतल्यावर आपणास कोणताही त्रास व वेगळे काही वाटत नसल्याचे डॉ. मुंडे यांनी हसतमुखाने सांगितले.
5 केंद्रांवरही शुभारंभ
दरम्यान, बुलडाण्याबरोबरच खामगाव, मलकापूर, शेगाव सामान्य रुग्णालय, चिखली, देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयातही लसीकरण करण्यात आले. 6 केंद्रांवर 600 आरोग्य कर्मचार्‍यांना कोविशिल्ड लस देण्याचे नियोजन आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: