बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

खबरदार! तिसऱ्यांदा ‘या’ चुका केल्या तर होणार फौजदारी गुन्‍हा दाखल!, वधू-वर, पालकांना 10 हजारांचा दंड, कोचिंग क्लास, लाॅन्स सील करण्याचेही प्रावधान!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः होय, जिल्ह्यात धडाक्याने सुरू असलेल्या दंडात्मक कारवायांना आणखी धारधार बनविण्यासाठी आता वारंवार निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या निर्लज्जांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर भरमसाठ दंडासह कोचिंग क्लास, मंगल कार्यालये, लाॅन्सला सील करण्यासही तैनात पथके मागेपुढे पाहणार नाहीये! यामुळे बेजबाबदार नागरिक व व्यावसायिक यांनी खबरदार राहिलेलेच!

जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाल्याबरोबर रामबाण उपाय ठरणाऱ्या दंडात्मक कारवाईचे अस्त्र उचलण्यात आले होते. यामध्ये स्वतः रस्त्यावर उतरत दोघा व्यापाऱ्यांना 10 हजारांचा दंड ठोठावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकाचवेळी पब्लिक व अधिकारी- कर्मचारी यांना कठोर संदेश देखील दिला. यामुळे आता जिल्ह्यातील तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी आदी अधिकारी रस्त्यावर जास्त अन्‌ ऑफिसात कमी दिसू लागले आहेत. या दंडात्मक अनुशासनाला आणखी कडक करीत जिल्हाधिकाऱ्यांनी आता तिसऱ्यांदा कोरोना विषयक निर्देशांचे पालन न करणाऱ्या निर्लज्जांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेशच काढलेत.

वानगीदाखल मास्क न घालणाऱ्याला, सार्वजनिक स्थळी पिचकाऱ्या मारणाऱ्यास प्रथम 200, दुसऱ्यांदा 300 तर तिसऱ्यांदा 500 रुपये दंड आकारतानाच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. आपल्या दुकानासमोर मार्किंग न करणे व ग्राहक 2 गज दुरी पाळत नसतील तर पहिल्यांदा 500 तर दुकानदाराला 2 हजार दंड देण्यात येईल. दुसऱ्यांदा हीच चूक केली तर दुकानदार फौजदारी कारवाईस पात्र ठरेल. किराणा व अन्य दुकानदाराने दुकानासमोर दरपत्रक लावले नाही तर पहिल्यांदा 5 हजार दंड व दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. मंगल कार्यालय, लाॅन्स मालक व वधू- वर पालकांनी निर्देश भंग केले तर प्रथम वेळी प्रत्येकी 10 हजार दंड व गुन्हे दाखल करण्याची समज देण्याचे निर्देश महसूल, पालिका व पोलिसांना देण्यात आले आहेत. दुसऱ्यांदा हीच घोडचूक केली तर कार्यालये व लाॅन्स 30 दिवसांकरिता सील करण्यात येणार आहे. याच प्रमाणे कोचिंग क्लासेस धारकांविरुद्ध करवाई करण्यात येणार आहे.

बुलडाण्यातील रस्ते ओस!
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
बुलडाणा शहरात संचारबंदीच्या
अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. दुपारी 3 नंतरच शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकांत शहर पोलिसांच्या वतीने कारवाईचा धडाका सुरु करण्यात आला आहे.
कारवाईपासून वाचण्यासाठी अशीही शक्कल
या संचारबंदीच्या काळात दूध ,मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. विनाकारण घराबाहेर पडणारे काही जण मेडिकल किंवा दवाखान्याची जुनी चिट्ठी सोबत ठेवत असल्याचे समोर आले आहे तर काही जण घरातीलच एखादे औषध खिशात ठेवत मेडिकलमधून आल्याचे सांगतात.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: