क्राईम डायरीमुख्य बातम्या

खामगावमध्ये हिट ॲन्‍ड रन… दुचाकीला धडक दिल्यानंतर भरधाव टँकर हॉटेलमधून पानटपरी, नंतर सलून दुकानात घुसले!; साडेअकरा लाखांच्‍या नुकसानीसह दोघे गंभीर जखमी; चालक होता दारूच्‍या नशेत!

खामगाव (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगावमध्ये हिट ॲन्‍ड रनसारखी घटना काल, 29 एप्रिलच्‍या रात्री 11 च्‍या सुमारास घडली. भरधाव टँकरने आधी दुचाकीला धडक देत दोघांना गंभीर जखमी केले. त्‍यानंतर हे टँकर हॉटेलमध्ये घुसले, तिथून ते पानटपरीला उडवून थेट सलून दुकानात शिरले. यात सर्व दुकानांचे मिळून साडेअकरा लाख रुपयांचे नुकसान झाले. टँकरचालक दारूच्‍या नशेत होता. ही घटना टॉवर चौक ते नांदुरा रोडवरील शुभंकरोती कॉम्पलेक्ससमोर घडली.

योगेश जंगलुमन निंबाळकर (25, रा. घाटपुरी खामगाव) यांनी या प्रकरणात खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून टँकरचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. योगेशला 5 भावंडे असून, त्‍यातील राहुल जेसीबी ऑपरेटर आहे. तो राजेश नानाराव जाधव (रा. सुटाळा बुद्रूक) यांच्‍याकडे रोजंदारीने काम करतो. काल 29 एप्रिलच्‍या रात्री 11 च्‍या सुमारास योगेश हा राजेश जाधव यांच्‍यासोबत मोटारसायकलने तर त्‍याचा भाऊ राहुल हा सुरेंद्र नानाराव जाधव यांच्‍यासोबत मोटारसायकलने शेलोडी येथून राजेश व सुरेंद्र यांना सुटाळा बुद्रूक येथे सोडण्याकरिता येत होते. टॉवर चौक ते नांदुरा रोडवर शुभंकरोती कॉम्पलेक्ससमोरील रोडवर भरधाव ट्रँकरने (क्र. MH 28 BB 3964) जोरात मागून येऊन राहुलच्‍या मोटारसायकलला (क्र. MH 28 BC 6623) धडक दिली. त्यामुळे राहुल व मोटारसायकल चालवत असलेला सुरेंद्र खाली पडले. त्‍यांच्‍या डोक्याला, छातीला व पायाला जोरदार मार लागला. त्‍यामुळे दुसऱ्या मोटारसायकलवर असलेल्या योगेश व राजेश यांनी टँकरचा पाठलाग सुरू केला. मात्र तो टँकर भरधाव निघून जवळीलच हॉटेल गौरवसमोरील डिव्हायडरला धडक मारून गौरव हॉटेलचे भिंतीला धडकला. यात हॉटेलचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. पुढे जाऊन टँकरने उमेश नागपुरे यांच्‍या पानटपरीला धडक दिली. यात त्यांच्‍या पानटपरी शेडचे व आतील मालाचे अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. पानटपरीच्‍या बाजुलाच असलेल्‍या विजय भातखेडे यांच्‍या सलून दुकानात नंतर टँकर घुसले. यात सलूनचे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले. सलूनमध्ये टँकर बंद पडला. योगेश व राजेश यांनी टँकरमधून चालकास बाहेर काढले असता तो नशेमध्ये होता. त्याला बोलता पण येत नव्हते. योगेशने ही घटना पोलिसांना कळवली.  त्‍यानंतर राहुल व सुरेंद्र यांना उपचाराकरिता खामगावच्‍या सामान्य रुग्णालयात भरती केले. राहुलला जास्त मार लागलेला असल्याने पुढील उपचाराकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: