क्राईम डायरीमुख्य बातम्या

खासगी सावकाराने शेतकरी कुटुंबाला आणले रस्‍त्‍यावर!; शेती हडपली, नांदुरा तालुक्‍यातील संतापजनक प्रकार

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गतिमंद मुलीच्‍या उपचारासाठी खासगी सावकाराकडे अडीच एकर शेती गहाण ठेवून 60 हजार रुपये व्‍याजाने काढणे शेतकऱ्याला आयुष्यातून उठवणारे ठरले आहे. या शेतकऱ्याची अडीच एकर शेती सावकाराने हडपली. तरीही हे कुटुंब शेतात दिसल्याने संतापलेल्या सावकाराने त्‍यांना हुसकावून लावण्यासाठी हल्ला चढवला. शेतकऱ्याच्‍या मुलीला पेटत्‍या गंजीत लोटले. सुदैवाने ही मुलगी वाचली. इसापूर (ता. नांदुरा) येथील शेतकऱ्याने नांदुरा पोलीस ठाणे गाठून सावकाराविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. सावकाराच्‍या खेळीने हे शेतकरी कुटुंब रस्‍त्‍यावर आले आहे.

विश्वेश्वर महादेव वसतकार (41, रा. इसापूर, ता. नांदुरा) यांची गावाजवळील नारखेड शिवारात अडीच एकर शेती आहे. मुलगी जान्‍हवी (12) गतिमंद असल्याने तिच्‍या उपचारासाठी त्‍यांनी नारखेड येथील खासगी सावकार रामेश्वर विष्णू खेलदार याच्‍याकडे 2015 साली शेत गहाण ठेवून 60 हजार रुपये 10 रुपये शेकडा व्याजाने घेतले होते. त्‍यानंतर त्‍यांनी वेळोवेळी त्याच्‍याकडून पैसे व्याजाने घेतले. त्‍यामुळे वसतकार यांच्‍याकडे खेलदारचे 3 लाख रुपये झाले व त्याचे व्याजसुध्दा वाढत चालले होते. 2018 मध्ये व्याजाने घेतलेले एकूण तीन लाख व त्यावरील व्याज फेडू न शकल्याने अडीच एकरापैकी रामेश्वर विष्णू खेलदार याच्‍याकडे गहाण ठेवलेले शेत सात लाख रुपये एकराने विकण्याचा सौदा झाला. मात्र एका एकराची खरेदी होत नसल्याने वसतकार यांनी त्याच्‍या म्हणण्यानुसार अडीच एकराची खरेदी त्याच्‍या नावावर करून दिली. नंतर तो दीड एकर शेती परत करणार होता, असे वसतकार यांचे म्‍हणणे आहे. त्याने खरेदी वेळेस वसतकार यांना सेंट्रल बँकेचा तीन लाख रुपयांचा चेक दिला होता. मात्र तो चेक वटलाच नाही. त्याच्‍या खात्यात पैसेच नव्हते.

खेलदारने खोटे बोलून व भूलथापा देऊन अख्खी अडीच एकर शेत घशात घातली होती. काल, 31 मे रोजी सकाळी 6 च्‍या सुमारास शेतकरी वसतकार, त्‍यांची पत्‍नी सौ. विजया व मुलगी जान्‍हवी शेतात गेल्याचे कळताच रामेश्वर खेलदार तिथे आला. तुम्ही शेता कसे काय आले, असा जाब विचारला. शेतातील काडी कचऱ्याची गंजी सौ. विजया पेटवत असताना त्‍याने जान्‍हवीला पेटत्या कचऱ्याच्‍या गंजीवर लोटले. वसतकार आणि त्‍याच्‍या पत्‍नीने धावून जान्‍हवीला वाचवले. यावेळी खेलदार तिथून पळून गेला. जान्‍हवी पाठीवर, कमरेच्या खाली मोठ्या प्रमाणावर भाजली आहे. वसतकार यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: