बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधितांवर रुग्णांवर 20 पॅकेजखाली उपचार; 6 खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी मान्यता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य या एकत्रित योजनांतून राज्यात 996 उपचारांचा लाभ दिला जात आहे. उपचारासाठी केवळ शिधापत्रिका किंवा तहसीलदारांचा दाखला किंवा शासनमान्य छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. कोविड 19 साथरोगाच्या गंभीर अवस्थेतील रुग्णांना या योजनांमध्ये उपचाराचा लाभ मिळतो. अशा गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरसह व व्हेंटिलेटरविना देण्यात येणाऱ्या 20 पॅकेजखाली उपचार मिळत आहेत. कोविडवरील उपचारादरम्यान पॅकेजचा कालावधी संपला व उपचार पूर्ण झाला नसल्यास रुग्णाच्या कुटूंबाचे 1.50 लक्ष रुपये संपेपर्यंत उपचाराचा कालावधी लांबवता येतो.

जर कुटूंबातील सर्व सदस्य रुग्णालयात दाखल असतील व लॉकडाऊन सुरू असल्यास कागदपत्रे सादर करता न आल्यामुळे उपचार थांबणार नाही. अशा परिस्थितीत फोन करूनही उपचार सुरू करता येतो. लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत लाभार्थी कागदपत्रे सादर करू शकतात. इतर उपचारांसाठी हा कालावधी 7 दिवसांचा असेल. शिधापत्रिकेचा व्हॉट्‌स ॲपवर पाठविलेला फोटोही नोंदणीसाठी स्वीकारला जाणार आहे. कोविडच्या रुग्णाच्या उपचाराचा समावेश योजनेतील पॅकेजमध्ये होत असल्यास व त्याची पूर्वपरवानगी मिळाल्यास कोविड चाचणीचा खर्च पॅकेजमध्ये अंतर्भूत असणार आहे. जिल्ह्यात 6 खासगी कोविड आजारावरील उपचारांना योजना अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये किंवा कोविड उपचारासाठी अंगीकृत केलेल्या रुग्‍णालयांमध्ये मिळणार असून, अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक किंवा विभागीय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक 155388 किंवा 18002332200 क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व खासगी व सरकारी अंगीकृत रुग्णालयांमध्ये 120 शासकीय राखीव प्रोसिजरवर उपचार केले जात आहेत. केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेची 67 पॅकेजेस सर्व अंगीकृत खासगी रुग्णालयांत मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहे. योजनेमध्ये अंगीकृत नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णाला जास्त रकमेचे देयक अदा करण्यास सांगितले असल्यास अशावेळी रुग्णाने complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर व संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा समन्वयक यांच्या ईमेलवर तक्रार नोंदवावी. उपचार सुरू असताना महागड्या इंजेक्शनचा खर्च योजनेच्या पॅकेजमध्ये समाविष्ट नसल्यामुळे तो खर्च रुग्णास करावा लागणार आहे, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सहाय्यक संचालक व जिल्हा समन्वयक यांनी कळविले आहे.

ही आहेत खासगी रुग्णालये…

मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, राठोड मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा, संचेती हॉस्पीटल बुलडाणा, सिटी हॉस्पीटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पीटल चिखली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close