क्राईम डायरीमुख्य बातम्या

गावात घडायच्‍या चक्रावणाऱ्या घटना, मग एकेदिवशी लागलाच छडा…; बेलाड येथील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बेलाड (ता. मलकापूर) गावातून रोजच कधी कुणाच्‍या बकऱ्या तर कधी म्हशी, कधी बैलजोड्या तर कधी चक्‍क इलेक्‍ट्रिक मोटार पंप, ठिबक नळ्या, स्प्रिंकलर असे शेतीउपयोगी साहित्य चोरीला जात होते. त्‍यामुळे गावकरी हैराण होते. नक्‍की या चोऱ्या करतंय कोण अन्‌ कशासाठी हेच कुणाला कळत नव्‍हते. अखेर 1 मार्चला याचे कारण सापडले अन्‌ चाऱ्या करणाराही. गावकऱ्यांनी मग छडाच लावण्याचा प्रयत्‍न केला. चोरटा शोधण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या आणि चोरटा अखेर रंगेहात हाती लागलाच. रात्री बकऱ्या चोरताना चोरटा गावकऱ्यांच्‍या जाळ्यात अडकला. गणेश इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरटा पकडला असला तरी त्‍याचा साथीदार मात्र पसार झाला आहे…

बेलाड येथे गणेश इंगळे यांची शेती आहे. शेतोसोबतच त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. 1 मार्च रोजी सायंकाळी त्यांनी शेळ्या घराजवळच्या वाड्यात बांधल्या होत्या. चोऱ्या वाढत असल्यामुळे ते सतर्क होते. गावकरीही वाढत्‍या चोऱ्यांमुळे हैराण असल्याने खडक्‌न वाजले की जागी होतात. त्‍यातच पहाटे 1 च्‍या सुमारास इंगळे यांची आरडाओरड झाल्‍याने आधीच सतर्क असलेले गावकरीही झटपट उठून त्‍यांच्‍याकडे धावले. गणेश इंगळे यांच्‍या बकऱ्यांच्या वाड्यात पांढरा शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती दिसला. सर्वांनी मिळून त्‍याला पकडले. तो होता गावातीलच मारोती निनाजी गवर(27). त्याच्यासोबत आणखी एक जण होता. पण तो पळून गेला. मलकापूर शहर पोलिसांच्‍या ताब्‍यात चोरट्याला देत इंगळे यांनी तक्रारही दिली. त्‍यावरून पोलिसांनी मारोतीसह त्‍याच्‍या साथीदाराविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. बेलाड येथील अनेक ग्रामस्थांनी सुद्धा शेतातील अनेक साहित्य चोरी झाल्याचा तक्रारी पोलिसांत दिल्या आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: