क्राईम डायरीमुख्य बातम्या

गुप्ता ट्रेडिंगच्‍या मालकाचे घर फोडले, खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्याने ५५ हजार रुपये रोख लंपास केले. ही घटना खामगाव शहरातील अमृतबाग तलाव रोड भागात १३ ऑगस्‍टच्‍या रात्री नऊच्‍या सुमारास घडली. १५ ऑगस्‍टला या प्रकरणी तक्रार देण्यात आल्याने खामगाव शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

विपीनकुमार सुमेरचंद गुप्ता (५३, रा. अमृतबाग तलाव रोड) यांचे टिळक पुतळा येथे गुप्ता ट्रेडिंग म्हणून कॅरिबॅग खरेदी- विक्रीचे दुकान आहे. १३ ऑगस्‍टला दुपारी अडीचला जेवण करून ते व त्‍यांचा मुलगा दत्ता घराला कुलूप लावून दुकानात आले होते. दुकान बंद करून ते रात्री ९ च्‍या सुमारास घरी परतले. घराची चावी मुलगी वनिषाकडे असल्याने त्‍यांनी तिला फोन करून बोलावून घेतले.

तेवढ्यात शेजारी राहणारे पवन राठी यांनी जोराने आवाज करून सांगितले की तुमच्या घराच्‍या मागून एक जण पळून गेला आहे. त्‍यामुळे सारे जण घरामागे धावले. पण चोर पळून गेलेला होता. घराची पाहणी केली असता दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता. घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील गोदरेज लोखंडी कपाटामधील सामान, दागिने अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातून ५५ हजार रुपये चोरट्यांनी गायब केले होते. घटनेवेळी गुप्‍ता यांची पत्नी व छोटी मुलगी आर्वी येथे गेलेले होते, तर मोठी मुलगी सिल्व्हरसिटी हाॅस्पिटलला डाॅक्टर असल्याने नोकरीवर गेली होती. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close