क्राईम डायरीमुख्य बातम्या

चारों मुल्‍को की पोलीस शोधत होती… खामगाव पोलिसांनी आवळल्‍या मुसक्‍या!; जालन्‍यातून आणले पकडून!!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्‍यभर २८ गुन्‍हे… विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळीकडेच त्‍यांच्‍या कृत्‍याची चर्चा… पण चोरी केली की टोळी पसार… सारे पोलीस मागावर… धूम स्‍टाईल यायचे अन्‌ गायब व्‍हायचे… पण खामगावमध्ये चोरी करून त्‍यांचे ग्रह फिरले. धडाकेबाज कामगिरीमुळे जिल्ह्यात सुपरिचित झालेल्या ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी या टोळीचा छडा लावण्याचा निर्धार केला, पथक कामाला लावले आणि या पथकाने अवघ्या एका दिवसात टोळीतील एकाला गळाला लावण्यात यश मिळवले आहे. जालन्‍यातून २५ वर्षीय तरुणाला पकडून आणले आहे.

खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील तुळजाई मल्‍टिकेअर हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल व लाईफ लाईन हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमध्ये २२ जूनच्या पहाटे चोरट्यांनी चोरी करून ३ लाख २० हजारांची रोकड लांबवली होती. ५ ते ६ धडधाकट तरुणांनी पांढऱ्या तवेरा गाडीतून येत या चोऱ्या केल्या होत्‍या. याच टोळीने ११ जूनला चाळीसगाव (जि. जळगाव खानदेश), १३ जूनला औरंगाबाद शहर, १६ जूनला वाशिम शहर, १८ जूनला नागपूर शहर व २० जूनला धुळे शहरात चोऱ्या केल्या होत्‍या. काही चोऱ्यांत कारचा व काही चोऱ्यांमध्ये मोटरसायकलचा वापर या चोरट्यांनी केला होता. तरीही हे चोरटे पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाले होते.

मात्र २२ जूनच्या पहाटे खामगाव शहरात दोन मेडिकलमध्ये चोरी केल्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. त्यामुळे २३ जूनच्या रात्री ११ च्या सुमारास शहर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकातील पीएसआय गौरव सराग, सुरज राठोड, दीपक राठोड, प्रफुल्ल टेकाडे, अमर ठाकूर यांनी गुप्त माहितीच्या आधारे जालना येथे छापा मारून या चोरट्यांच्या टोळीतील एकाला अटक केली. जालन्याच्या गुरुगोविंदसिंग कॉलनीतून संजूसिंग कृष्णसिंग भादा (२५) याला ताब्‍यात घेतले. त्याच्याकडून तवेरा गाडी (MH 20 CH 8786) व चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले. या टोळीविरुद्ध राज्यात २८ गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: