बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

चिखलीत संशयित “ब्लॅकमेलर लेडी’चे सामान घराबाहेर फेकले! नगरसेवकासह संभाजीनगरातील रहिवासी एकवटले

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रतिष्ठितांना ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचा संशय असणाऱ्या महिलेने चिखली शहरातील संभाजीनगरात काही दिवसांपूर्वी भाड्याने घर घेतले होते. तिच्या कारनाम्यांची चर्चा परिसरात सुरू होताच नागरिकांनी त्या भागातील नगरसेवकांना या प्रकाराची माहिती दिली. काल, ८ ऑगस्‍टला नगरसेवक व नागरिकांनी तिच्या घरी जाऊन घर सोडण्यासाठी तिला आज सकाळी ९ वाजेपर्यंतचा अल्‍टिमेटम दिला होता. आज सकाळी तिचे घर बंद होते. मात्र घरात तिचे सामान तसेच असल्याने नागरिकांनी घराचे लॉक तोडले आणि घरातील सामान रस्त्यावर फेकून दिले. या प्रकारामुळे चिखली शहरात खळबळ उडाली आहे.

या महिलेने चिखलीसह जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठितांना ब्लकॅमेल केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिच्या कारनाम्यांवर अंकुश लावावा म्‍हणून चिखलीतील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी चिखलीच्या ठाणेदारांना निवेदन दिले होते. मात्र कुणीही थेट तक्रार दिली नव्हती. संशयित महिला यापूर्वी चिखलीच्या राऊतवाडी भागात भाड्याचे घर घेऊन राहत

होती. मात्र तिच्या कृत्यांमुळे तिला तिथेही विरोध झाला होता. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी संभाजीनगरातील एक घर तिने भाड्याने घेतले होते. मात्र परिसरातील नागरिकांना याची कुणकुण लागताच त्यांनी प्रभागाचे नगरसेवक गोविंद देव्हडे यांना ही माहिती दिली. त्यानंतर भाजपचे ज्‍येष्ठ नेते रामदास देव्हडे, नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी त्या महिलेचे घर गाठले. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीनगरातील नागरिकांसह अनेक महिला सोबत होत्या. आपल्या नगरात राहू नका, दुसरीकडे कुठेतरी निघून जा, अशी सूचना महिलेला केली. सकाळी ९ वाजेपर्यंत घर खाली केले नाही तर घराबाहेर सामान फेकू, असा अल्‍टिमेटम महिलेला दिला होता. त्यानुसार आज सकाळी पुन्हा परिसरातील नागरिक व नगरसेवक तिथे गेले असता महिला घराला लॉक करून निघून गेली होती. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी घराचे कुलूप तोडले व घरातील सर्व सामान रस्त्यावर आणून फेकले.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: