जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

चिखली हद्दवाढ : आजी-माजी आमदारांत श्रेयवादाची लढाई!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली शहराच्‍या हद्दवाढीच्‍या प्रस्‍तावाला मान्यता मिळाल्‍यानंतर आजी-आमदारांत श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. आमदार श्वेताताई महाले यांनी गेल्या काही महिन्‍यांपासून हा प्रश्न रेटल्‍याचे सर्वश्रुत आहे, पण काल मान्यता मिळाल्‍यानंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांनीही आपल्‍याच प्रयत्‍नांमुळे ही बाब शक्‍य झाली आणि महाविकास आघाडीचे सरकार असल्याने माझ्या प्रयत्‍नांना सकारात्‍मक प्रतिसाद मिळावा, असा दावा केला. पुराव्‍यादाखल त्‍यांनी पाठपुराव्याची निवेदने आणि छायाचित्रेही प्रसारमाध्यमांकडे दिली.

10 वर्षे राहुल बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्वेताताई महाले यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. असे असले तरी 2014 पासूनच ताईंनी या लढाईचे रणशिंग फुंकले होते. जिल्हा परिषदेत सभापती पद मिळवल्यानंतर त्यांनी थेट आमदार राहुल बोंद्रे यांच्‍याशी टक्कर घेतली होती. तेव्हाच भाजपच्या आमदारकीच्‍या उमेदवार श्वेताताई महाले पाटील याच राहतील, अशी शक्‍यता वर्तविणे सुरू झाले होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी बोंद्रे यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे बोंद्रे कायम चर्चेत होतेच. चिखलीचे राजकारण आपल्याभोवतीच केंद्रीत राहील याची काळजी दोन्ही नेत्यांनी आजवर घेतली आहे. काल, 30 मार्चला राज्य शासनाने चिखली नगरपरिषदेच्या हद्दवाढीची घोषणा केली. (नेहमीप्रमाणे ही बातमी सर्वात आधी बुलडाणा लाइव्‍हने दिली). सोबतच नेहमीप्रमाणे हे काम आपल्यामुळेच कसे झाले हे सांगण्याची चढओढ आजी- माजी आमदारांत लागली. आमदार श्वेताताई महाले यांनी मंत्र्यांना भेटून, चर्चा करून, पत्र, निवेदने देऊन पाठपुरावा केल्यामुळे मागणीला  यश मिळाल्याचे सांगितले. दुसरीकडे राहुल बोंद्रे यांनीही गेल्या 10 वर्षांच्या काळात यासाठी आपण प्रयत्न केल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकार असल्याने आमच्याच सरकारने हा प्रश्न मार्गी लावल्याचे त्‍यांनी ठासून सांगितले.

चिखली शहरातील सदानंदनगर, सैलानीनगर, कोळीवाडी, बारीवाडी, गोकुळनगर, चव्हाणवाडी हे भाग सातबारानुसार चिखलीत होते. मात्र नगर पालिकेच्या हद्दीत यांचा समावेश नव्हता. त्यामुळे या भागातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर काल नगरविकास मंत्रालयाने हद्दवाढीची घोषणा केल्यामुळे या भागातील नागरिक सुखावले. राजकारण म्हटलं की श्रेयवादाची लढाई चालणार हे निश्चित; मात्र  आता नगरपरिषद हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या या भागात विकास घडवून आणण्यासाठी या नेत्यांनी त्यांच्या पातळीवर लढाई लढावी, अशीच अपेक्षा नागरिक  व्यक्त करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: