बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जनतेला न्याय देणारे अधिकारी न्यायासाठी उतरले रस्त्यावर! 97 तहसीलदार, नायब तहसीलदारासह उपजिल्हाधिकारीही सामूहिक रजेवर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला व आरोपी विरुद्ध न झालेली कारवाई याच्या निषेधार्थ व अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी एकवटल्याचे आज, 2 फेब्रुवारी रोजी दिसून आले. आज पुकारण्यात आलेल्या सामूहिक रजा आंदोलनमध्ये जिल्ह्यातील 97 तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच उपजिल्हाधिकारी सहभागी झाले. यामुळे जिल्हाधिकारी, 6 एसडीओ व 13 तहसीलमधीलचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले.


नायब तहसीलदार पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर मागील 23 जानेवारीला रेतीमाफिया व त्याच्या टोळक्याने चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर 24 जानेवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. यामुळे महसूल अधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली असून हल्लेखोरांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आक्रमक झाली आहे. तसेच एसडीओ संवर्गातील अधिकारीदेखील पुढे सरसावले आहे. नुकतेच सुरेश बगळे, श्री. खडसे, श्री. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले. त्यानुसार 2 फेब्रुवारीला राज्याप्रमाणे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांनी जवळपास रस्स्यावर उतरल्याने अधिकार्‍यांच्या भावना किती तीव्र आहे हे स्पष्ट झाले.


जिल्हा कचेरीत ठिय्या
आजच्या आंदोलनात आरडीसी दिनेश गीते, एसडीओ राजेश्‍वर हांडे, उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, भिकाजी घुगे, अनिल माचेवाड, भूषण अहिरे, अभिजित नाईक, तहसीलदार रुपेश खंडारे, श्यामला खोत, अश्‍विनी जाधव, पुष्पा दाभेराव, सुनील आहेर, पी. के. करे, अनंता पाटील, व्ही. के. पाटील, के. व्ही. पाटील, संजय बनगाळे, ए. व्ही. पवार, मंजुषा नेतांम, श्याम भांबळे यांच्यासह 21 तहसीलदार, 64 नायब तहसीलदार मिळून 97 अधिकारी आंदोलनात सहभागी झाले. या परिणामी जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले.
…तर 8 मार्चपासून बेमुदत बंद
दरम्यान, मागण्यांची दखल घेतली नाही तर येत्या 8 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष आर. एन. देवकर, उपाध्यक्ष शिवाजी मगर, उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव सुनील आहेर यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी शीतल रसाळ, अजित येले,स्वप्नाली डोईफोडे, पंकज मगर आदी सहभागी झाले आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: