खामगाव (घाटाखाली)मुख्य बातम्या

जय गजानन… भाविकांच्या वर्दळीने शेगाव येतेय पूर्वपदावर!; दिवसाला साडेनऊ हजारांवर भाविकांची गजबज!; व्यावसायिकांत पुन्हा उत्साह

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संत श्रेष्ठ श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येत भाविक शेगावला येतात. कोरोनाच्या संकटामुळे वर्दळ मागील सहा महिने मंदावली होती. पण संसर्ग कमी होऊ लागताच शेगाव भाविकांनी फुलू लागले आहे. दिवसाला साडेनऊ हजाराच्या वर भाविकांची नोंद होत असल्याचे संस्थानच्या सूत्रांनी सांगितले.

कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने 16 नोव्हेंबरपासून मंदिर उघडण्याची परवानगी दिली. त्यानंतर मात्र संस्थांनने खबरदारीचे सर्व उपाययोजना आखून एक दिवस उशीरा 17 नोव्हेंबरपासून भाविकांसाठी मंदिर घडले होते. ई पासवर साडेनऊ हजारवर भाविक आज रोजी दर्शन घेतात. सुरुवातीला काही दिवस बंद असलेली महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी विश्‍वस्त निळकंठ दादा पाटील यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली आहे.

दिवसभरात सुमारे साडेचार हजारांच्या वर भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. श्रींच्या दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे. ई पास काढून येणार्‍यांना दर्शनाची सोय उपलब्ध आहे. भाविकांची वर्दळ वाढली असल्याने मंद पडलेल्या व्यवसायाला नवी संजीवनी मिळाली असून, शेगावातील बाजारपेठेमध्येही उत्साह बघण्यात मिळत मिळत आहे. कोरोनाच्या काळात मंदिर परिसरात शुकशुकाट असताना आज मात्र भाविकांच्या वर्दळीमुळे  उत्साहाचे वातावरण व्यावसायिकांमध्ये दिसत आहे. नास्त्याची दुकाने, हॉटेल, खेळण्याची दुकाने, छोटे-मोठे व्यवसाय करणार्‍यांची दुकाने, हार-फुले प्रसादाची दुकाने गजबजून गेली आहेत.

भक्तनिवासही सुरू…

देशभरातून येणार्‍या भाविकांसाठी श्री संत गजानन महाराज संस्थानने निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आदर्शवत व्यवस्था या भक्तनिवासात असल्याने शेगावात येणारा प्रत्येक जण त्याचा लाभ घेत असतो. मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आल्यानंतर भक्तनिवासही बंद होते. आता मात्र भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे भक्तनिवाससुद्धा सुरू करण्यात आले आहे. ई पास असलेल्या भाविकांना गरजेनुसार हे निवास उपलब्ध करून दिले जात आहेत.

कोरोना संकटामुळे मंदिरावर अवलंबून असणार्‍या आमच्या सारख्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आज मंदिर परिसरात भाविकांच्या वर्दळीमुळे आमच्यासारखे छोटे व्यवसायिक दोन पैसे घरी घेऊन जातात. त्यामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

– राहुल धानोकार, खेळणी दुकान व्यावसायिक

मंदिर उघडल्यामुळे दुकाने सुरू झाली. भाविकांची वर्दळ सुरु झाली आमच्यासारख्या कामगारांवर उपासमारीची वेळ या कोरोनाने आणली होती. आज मात्र श्रींच्या कृपेमुळे सर्व काही ठीक होत आहे. जय गजानन!

– प्रसाद दुकानातील एक कामगार

जवळपास सात महिन्यांपासून माझी नाश्त्याची दुकान कोरोनामुळे बंद होती. 17 नोव्हेंबरला मंदिर सुरू झाले. त्याचबरोबरच मी माझी नाश्त्याची दुकान सुरू केली. आज भाविक भाविक येतात नाष्टा करतात. त्यामुळे दोन पैसे घरात येऊ लागले आहेत.

– एक नास्ता हॉटेल व्यावसायिक

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: