बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जय श्रीराम…!; अयोद्ध्येतील मंदिरासाठी जिल्ह्यातील 6 लाख 7 हजार घरांशी होणार संपर्क; 12 हजार रामभक्त 15 दिवस करणार निधीसंकलन

15 फेब्रुवारीपर्यंत चालणार गृहसंपर्क महाअभियान
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः
अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माणासाठी जिल्ह्यात निधीसंकलन सुरू आहे. जिल्ह्यात ग्राम वस्ती गृह संपर्क महाभियानाला काल, 1 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली. 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान हे महाअभियान चालणार असल्याची माहिती बुलडाणा विभाग संघचालक चित्तरंजन राठी यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.
6 लाख कुटुंबांशी संपर्क करणार
महाअभियाना दरम्यान बुलडाणा जिल्ह्याची घाटावरील (बुलडाणा जिल्हा) आणि घाटाखालील (खामगाव जिल्हा) अशी रचना करण्यात आली आहे. घाटावरील 3 लाख 8 हजार आणि घाटाखालील 2 लाख 99 हजार घरांशी येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष गृहसंपर्क करण्यात येणार आहे.
शहरी भागात असे चालेल अभियान
जिल्ह्यातील 12 नगरांसाठी 237 वस्त्यांची(प्रभाग) रचना करण्यात आली आहे, प्रत्येक वस्तीसाठी 1 वस्तीप्रमुख आणि 10 जणांचे अभियान पथक अशी कार्यकर्ता रचना करण्यात आली आहे. घाटाखालच्या 6 नगरांमध्ये 53 वस्त्यांमध्ये 225 उपवस्त्या अशी रचना करण्यात आली आहे.
ग्रामीणसाठी अशी आहे गृहसंपर्काची योजना
घाटावरील 554 आणि घाटाखालील 562 गावांशी संपर्क करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. 15 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत या सर्व गावामध्ये ग्राम बैठकी झाल्या असून प्रत्येक गावासाठी 1 ग्रामप्रमुख आणि 15 जणांचे अभियान पथक अशी रचना करण्यात आली आहे.
पैसा नाही माणसे जोडण्यासाठी हे महायाभियान
प्रभू श्रीराम हे देशाच्या एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहेत. राम मंदिरासाठी 492 वर्षे सतत संघर्ष केला आहे. त्यामध्ये 4 लाखांहून जास्त रामभक्तांनी बलिदान दिले आहे. या आंदोलनांचा परिणाम म्हणून 9 नोव्हेंबर 1989 रोजी अनुसूचित समाजाचे कामेश्‍वर चौपाल यांनी रामजन्मभूमीवर शिलान्यास केला. करोडो देशवासीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेले भव्य राममंदिर आता अयोध्येत उभे राहत आहे. यासाठी देशातल्या प्रत्येक हिंदूचे योगदान आहे. प्रभू श्रीरामांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे महाअभियान सुद्धा माणसे जोडण्यासाठी, देश जोडण्यासाठी असल्याचे चित्तरंजन राठी म्हणाले.
असे असेल भव्य राममंदिर
एकूण क्षेत्रफळ ः 2.7 एकर.
एकूण बांधकाम क्षेत्र ः 57,400 वर्गफूट
एकूण लांबी ः 360 फूट
एकूण रुंदी ः 235 फूट
एकूण उंची कळसापर्यंत ः 161 फूट
मंडपाची संख्या ः 5
एकूण तीन मजले आणि प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट.

असा लावता येईल हातभार
भव्य राममंदिर निर्माणासाठी निधी समर्पण करण्यासाठी प्रति व्यक्ती 10 रुपयांचे कुपन, परिवारासाठी 100 आणि 1000 रुपयांचे कुपन तयार करण्यात आले आहे. 2000 रुपयांपेक्षा अधिक समर्पण करणार्‍यांना पावती देण्यात येणार आहे. चेकद्वारे देण्यात येणार्‍या निधी समर्पणावर आयकर विभागाची सूट मिळणार आहे. आपल्या परिवाराशी संपर्क करण्यासाठी महाअभियान पथकाच्या सदस्याजवळ ही समर्पण राशी देऊन राष्ट्रमंदिर उभारणीच्या कार्यात योगदान द्यावे, असे भव्य श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन समितीचे सदस्य चित्तरंजन राठी (बुलडाणा विभाग संघचालक,रा.स्व.संघ) यांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: