क्राईम डायरीमुख्य बातम्या

जळगाव जामोद ः इलेक्शनमधील सुडाग्नी पेटला… विरोधकांवर घरात घुसून सशस्त्र हल्ला, शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्यासह सहा जण जखमी; महिलेचीही छेडछाड

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात मतदान केले म्हणून दहा जणांनी विरोधकाच्या घरात घुसून सशस्त्र हल्ला चढवला. तलवार, कुर्‍हाडी, फावडे, लाठ्याकाठ्या चालल्या. यात सहा जण रक्तबंबाळ झाले. शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील यांच्या गळ्यातील 50 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून बेदम मारहाण करण्यात आली. एका महिलेची साडी ओढून ब्लाऊज फाडून छेडछाड काढली गेली. हा सर्व रक्तरंजीत धुडगूस उसरा बुद्रूक (ता. जळगाव जामोद) येथे 15 जानेवारीच्या सायंकाळी सुरू होता. या प्रकरणात आज, अनिकेत पाटील (21) याने तक्रार दिल्यावरून पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

श्रीकृष्ण हरिभाऊ शिंबरे, प्रमोद श्रीकृष्ण शिंबरे, श्रीकांत श्रीकृष्ण शिंबरे, धनंजय श्रीकृष्ण शिंबरे, चेतन श्रीकृष्ण शिंबरे, यश प्रमोद शिंबरे, सौ. शालिनी श्रीकृष्ण शिंबरे, निता प्रमोद शिंबरे, सौ. कल्पना धनंजय शिंबर, सौ. कांचन श्रीकांत शिंबरे (सर्व रा. उसरा बुद्रूक) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. 15 जानेवारीला दुपारी दीड ते दोनच्या सुमारास अनिकेत उमेश पाटील, आशिष पंढरी घाईट, हर्षद दत्तात्रय घाईट, शुभम दत्तात्रय घाईट, वैभव पंढरी घाईट, उमेश राजकुमार घाईट हे अनिकेतच्या घरासमोर उभे होते. त्याचवेळी शिंबरे कुटुंबिय तिथे आले. आमच्या पॅनलला मतदान का करत नाही, असे ओरडून धमक्या देऊ लागले. त्याचवेळी तिथे शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील आले आणि त्यांनी शिंबरे कुटुंबियांना समजावून सांगितले. मात्र तरीही जीवे मारण्याची धमकी देत शिंबरे कुटुंब निघून गेले. त्याानंतर संध्याकाळी साडेसहा -सातच्या सुमारास शिंबरे कुटुंबियांनी पुन्हा येऊन घरात घुसून पाटील यांच्यावर हल्ला चढवला. लाठ्याकाठ्या, फावडे, तलवार, कुर्‍हाडी, कोयते घेऊन त्यांनी काही कळायच्या आतच हल्ला केला. दत्ता पाटील यांच्या गळ्यातील 50 ग्रॅमची सोन्याची चैन हिसकावून लाठीकाठी, कोयत्याने त्यांच्यावर वार करत गंभीर जखमी केले. राजकुमार पाटील, उमेश पाटील, पंढरी घाईट, हर्षद घाईट यांना जबर मारहाण केली. यात सारेच गंभीर जखमी झाले. अश्‍लील शिविगाळ करत जीवे मारून टाकतो, असे म्हणत असतानाच गावातील तुकाराम वानखडे, देवानंद वानखडे, मैनाबाई जगताप, आशिष घाईट, शिवचरण घाईट, सुधा घाईट यांनी धाव घेऊन त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली. मदतीसाठी धावलेल्या एका महिलेची साडी ओढून, ब्लाऊज फाडून छेडखानी केली. त्यानंतर अनिल राजकुमार घाईट, आशिष पंढरी घाईट, चंदनसिंह डावर व गावातील अन्य 10 -12 लोकांनी शिंबरे कुटुंबाला आवरले. गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. या प्रकरणात पोलिसांनी शिंबरे कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलीस निरिक्षक सतीश आडे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: