बुलडाणा (घाटावर)

जिजाऊ जन्मोत्सव घरीच राहून साजरा करा – जिजाऊ जन्मोत्सव सोहळा समितीचे आवाहन

मातृतीर्थातील रामदास कुरंगळ यांना शाहीर सम्राट पुरस्कार जाहीर
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले) :
यावर्षी माँ जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या गर्तेत सापडलेला असून, शासकीय नियम-अटी व शर्ती सांभाळून साजरा करावा लागणार आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय सूचना व आयोजन समितीच्या समन्वयाने उत्सव साजरा करून सर्वांनी आपापल्या घरी आपआपल्या परीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करावा. जिजाऊ सृष्टीवरील उत्सव सोशल मीडियामार्फत बघावा, असे आवाहन जिजाऊ जन्मोत्सव सोहळा समितीने केले आहे.
समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले, की ३ जानेवारी ते १२ जानेवारीदरम्यान सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सव हा कार्यक्रम सुरू असून, सर्व कार्यक्रम ऑनलाइन सोशल मीडियामार्फत सुरू आहे. ११ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला जिजाऊ जन्मस्थळ राजवाड्यावर दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता जिजाऊ ब्रिगेड महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम जिजाऊ सृष्टी येथे होणार आहे. १२ जानेवारी रोजी मुख्य जन्मोत्सव सोहळ्याची सुरवात राजवाडा येथे मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख जोडप्यांसह सकाळी ६ वाजता महापूजनाने होणार आहे. सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टी येथे ध्वजारोहण, सकाळी ९ ते ११ दरम्यान शाहिरांचे पोवाडे यामधे महाराष्ट्रातील नामवंत शाहीर सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता मुख्य कार्यक्रम मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मराठा विश्वभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी अस्थीव्यंगावर मात करून आयएएस झालेली प्रांजली पाटील यांना जिजाऊ पुरस्कार, यशवंत सूर्यवंशी यांना मराठा भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.मातृतीर्थातील जिजाऊ भक्त शाहीर रामदास कुरंगळ यांना शाहीर सम्राट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर दरवर्षी ३ ते १२ जानेवारी रोजी पर्यत असणारा जन्मोत्सव सोहळा आता मागील वर्षीपासून ३ जानेवारी ते १४ जानेवारी असा करण्यात आला असून, १४ जानेवारी रोजी संत चोखामेळा यांच्या जन्मस्थानी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी महापूजा करतील, असेही समितीतर्फे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
जन्मस्थळाचे दर्शन होईना…
माँ जिजाऊंचे जन्मस्थळ जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असताना अद्याप जिजाऊ भक्तांसाठी ते खुले करण्यात आलेले नाही. देशासह राज्यातील सर्व देवस्थाने दर्शनासाठी खुले झाले असताना मातृतीर्थातील जिजाऊ जन्मस्थळ मात्र बंद असल्यामुळे जिजाऊ भक्तांमधे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: