बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिजाऊ सृष्टीसाठी ६०० कोटींचा निधी मिळवू : पालकमंत्री; सिंदखेड राजात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार : आरोग्यमंत्र्यांची घोषणा

सिंदखेड राजा (राजेश कोल्हे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक घेऊन मागे मंजूर झालेले २५०कोटी आणि आताचे ३५० कोटी मिळून ६०० कोटींचा निधी मिळवू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर आयोजित जिजाऊ जन्मोत्सवात आज, १२ जानेवारीला दिली. यावेळी मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा विश्वभूषण पुरस्कार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना श्री. टोपे यांनी सिंदखेड राजा येथे लवकरात लवकर एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली.

मराठा सेवा संघातर्फे यंदाही १२ जानेवारीला जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. मुख्य सोहळा आणि विश्वभूषण, मराठा भूषण पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले. मराठा सेवा संघाची स्थापना पुरुषोत्तम खेडेकर यांनी १९९० साली केली आहे व सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीची स्थापना १९९६साली करण्यात आली आहे. या वर्षीचा विश्वभूषण पुरस्कार राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना कोरोना काळात ज्या पद्धतीने त्यांनी जनतेला दिलासा देण्याचे काम केले त्यासाठी प्रदान करण्यात आला. मराठा भूषण पुरस्कार यशवंत सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजकांच्या वतीने सिंदखेड राजा येथील विकास कामांकरिता मंजूर झालेल्या निधीतून जिजाऊ सृष्टीच्या विकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विविध पुस्तकांचे व दिनदर्शिकांचे प्रकाशनही झाले. व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार रेखाताई खेडेकर, रजनीताई राजेंद्र शिंगणे, मनिषा राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, शिवाजी राजे जाधव यांची उपस्थिती होती.

राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांकडून माँ जिजाऊंना मानवंदना


सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणास्त्रोत राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांनी मानवंदना दिली. सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज व देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्यासह परिसरातील किनगाव राजा, आडगाव राजा, मेहुणाराजा, उमरद व जवळखेड येथील राजे जाधव परिवाराच्या हस्ते मानाची पूजा झाली व माँ जिजाऊंचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. राजवाड्यातील जिजाऊंच्या जन्मस्थळावरील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तसेच आरती ओवाळूनही पूजा करण्यात आली. कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने या सोहळ्यास मर्यादित स्वरूप दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागांत व महाराष्ट्राबाहेर स्थायिक असलेले राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज तसेच इतर जिजाऊ भक्त सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून राजवाड्यामध्ये आयोजित या महापूजेस राजे बाबुराव जाधव, राजे जितेंद्र जाधव, राजे सुभाषराव जाधव, राजे गोपाल जाधव, राजे आनंदराव जाधव, राजे विठ्ठल जाधव, राजे विजय जाधव, राजे बाळासाहेब जाधव व इतर वंशज माँ जिजाऊंना अभिवादनासाठी उपस्थित होते.

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त आज जिजाऊ नगरी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अभिवादन करताना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, सौ. रजनीताई राजेंद्र शिंगणे, रविकांत तुपकर, पुष्पक भैया, कु. लक्ष्मीताई.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: