बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! कोरोना रुग्‍णांच्‍या लुटीला बसणार चाप! नियमानुसार बिल दिले नाही तर त्‍या रुग्‍णालयाचा थेट परवाना होणार रद्द अन्‌ गुन्‍हेही दाखल होणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खासगी कोविड सेंटर्सच्‍या मनमानीला लुटीला चाप लावण्यासाठी राज्‍य सरकारने शहर, जिल्हानिहाय दरनिश्वित केले असतानाच, अनेक नियम लागू केले असून, या नियमांचा भंग करणाऱ्या रुग्‍णालयाचा थेट परवानाच रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय गुन्‍हाही दाखल होणार आहे. त्‍यामुळे साहाजिकच अशा लुटारू रुग्‍णालयांचे धाबे दणाणले आहेत.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार खासगी कोविड रुग्णालयांना कोविड रुग्णांकडून घ्यावयाच्या शुल्काची निश्चिती करण्यात आली आहे. सर्व खासगी कोविड रुग्णालयांनी समान दर असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांकडूनही समान असलेले दर घ्यावे. त्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी दर निश्चित करण्यात आले असून, त्याबाबतच्या अटी व शर्तीही लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही खासगी कोविड रुग्णालय, नर्सिंग होम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेशिवाय 80 टक्के बेडची संख्या कमी करू नये. महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 2006 मधील तरतुदींना अनुसरून सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून खासगी कोविड रुग्णालयांनी बेड वाढविण्याबाबत कार्यवाही करावी. शासन निर्देशानुसार उपलब्ध बेड संख्येच्या 80 टक्के बेडवर उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांकडून शासकीय दराने उपचार करून आरोग्य सुविधा पुरवाव्यात. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व नर्सिंग आणि सहाय्यक कर्मचारी यांना संपूर्ण पाठिंबा व सहकार्य करावे. कोणत्याही गटाकडून किंवा समूहाकडून सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याच्या कार्यात अडथळा निर्माण करणारी कृती झाल्यास दंडात्मक तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. कोणत्याही रुग्णालयात या आदेशातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास अशा रुग्णालयाचा परवाना रद्द करणे व भारतीय दंड संहीता अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

आरोग्य सेवा प्रदाते यांनी परवानगी असलेली बेड संख्या, कार्यान्वित बेडची संख्या, रिक्त असलेल्या बेडपैकी व नॉन रेगुलेटेड या वर्गवारीतील बेडची संख्या दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे. सर्व रुग्णालयांनी निश्चित करण्यात आलेले दराचे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत. हे दर जिल्ह्यातील सर्व खासगी कोविड रूग्णालय अथवा नर्सिंग होम यांना लागू असून कोरोनाबाधित रुग्णांकडून यापेक्षा जास्त रक्कम घेऊ नये.

शासन मार्गदर्शक सूचनेनुसार 80 टक्के व 20 टक्के बेड क्षमतेवर भरती असलेल्या रुग्णांच्या उपचारामध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. हे दर जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असणार आहेत. निश्चित दर व अटी, शर्तींचे खासगी कोविड रूग्णालय यामध्ये पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रूग्णालयाचा परवाना रद्द करून साथ रोग अधिनियम 1987, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियम 2011, महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 2006, बॉम्बे नर्सिंग होम कायदा 2006, भारतीय दंड संहीता नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस रामामर्तूी यांनी कळविले आहे.

असे आहेत दर
बुलडाणा जिल्हा कोविड दरांबाबत ‘क’ वर्गात येतो. त्यानुसार रूटीन वार्ड अधिक आयसोलेशनसाठी 2400 रुपये प्रति दिवस, व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू अधिक आयसोलेशन 4500 रुपये प्रति दिवस, व्हेंटीलेटरसह आयसीयू अधिक आयसोलेशन 5400 रुपये प्रति दिवस. या दरांमध्ये रक्तातील सीबीसी तपासणी, युरीन तपासणी, एचआयव्ही स्पॉट अँटी एचसीव्ही, सेरम क्रीएटीनाईन, यूएसजी, टु डी इको, एक्स रे, ईसीजी, ऑक्सिजन चार्जेस, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण आदींचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: