बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात चक्काजामची पोलिसांनी काढली हवा!; ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनीच केले आंदोलन, बाकी संघटनांची अनास्था!!

बुलडाणा ः संयुक्त किसान मोर्चाने आज, 6 फेब्रुवारीला चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली होती. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी आंदोलन केले. बाकी संघटनांची अनास्था दिसून आली. बुलडाणा तालुक्यात वरवंड फाट्यावर, मेहकर, डोणगावमध्येही आंदोलन झाले. संग्रामपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते कार्यकर्त्यांसह आज रेल्वे रोखणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.


वरवंड फाट्यावर आंदोलन
बुलडाणा (कृष्णा सपकाळ) ः
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ’स्वाभिमानी’चे युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 1:30 वाजता बुलडाणा ते नागपूर मार्गावरील वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी राणा चंदन यांच्यासह 30 कार्यकर्त्यांना अटक केली. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून सर्वांना सोडून देण्यात आले. आंदोलनात शे. रफिक शे. करीम, सय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, गजानन गवळी, नेहरूसिंग मेहेर, मारोती मेढे, गोपाल जोशी, शेख आझाद, विष्णू धंदर, संतोष गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रशांत डिक्कर यांना घेतले ताब्यात
जळगाव जामोद (गणेश भड) ः
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना बोडखा येथून मध्यरात्री 12:30 वाजताच पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की प्रशांत डिक्कर आणि त्यांचे कार्यकर्ते शेगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करणार आहेत. याची चुणूक पोलिसांना लागताच संग्रामपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे, पी. एस. आय. श्रीकांत विखे, पो. काँ. प्रमोद मुळे, अमोल बोदडे, गुप्तहेर विभागाचे शैलेश बहादूरकर यांच्यासह पोलिसांचा ताफा मध्यरात्री 12:30 वाजता प्रशांत डिक्कर यांच्या घरी पोहोचला. तिथून त्यांना ताब्यात घेत ठाण्यात आणण्यात आले. आंदोलनाच्या धसक्याने शेगाव शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला.


मेहकर, डोणगावमध्ये रास्ता रोको
मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः
मेहकर आणि डोणगावमध्ये दुपारी 12 ते 3 या वेळेत रास्ता रोको करण्यात आला. अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे समन्वयक राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर टाले यांच्या नेतृत्वाखाली मेहकर येथे औरंगाबाद- नागपूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रंचड घोषणाबाजी केली. आंदोलना दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलन करत असताना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी डॉ. टाले यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आंदोलन करताना ताब्यात घेऊन अटक केली होती. प्रफुल्ल देशमुख, नितीन अग्रवाल, सहदेव लाड, अनिल पवार, अशपाक शहा, अफरोज शहा, सदाशिव वडुळकर, अजम कुरेशी, अजगर कुरेशी, अ‍ॅड. विष्णू सरदार, अरुण गवळी, गजानन धंदोरे यांच्यासह शेतकरी सहभागी होते. डोणगावात झालेल्या आंदोलनात राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर लांभाडे, राजेंद्र पळसकर, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवत जाधव, चरण आखाडे, भगवान बाजड, जुबेर खान, संदीप पांडव, मुक्तेश्‍वर काळदाते, गजानन भगत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुका अध्यक्ष अमोल धोटे, आकाश जावळे, रवि पांडव, संजय गायकवाड, युसूफ पठाण, अविनाश खोडके, नीलेश सदावर्ते यांच्यासह अनेक शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: