क्राईम डायरीमुख्य बातम्या

जिल्ह्यात हाणामारीच्‍या घटनांना ऊत..!; बुलडाणा, बोराखेडी, माक्‍ता, लाडनापुरात क्षुल्लक कारणावरून ‘रक्‍त’पात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या हाणामाऱ्यांना अक्षरशः ऊत आला आहे. कोरोनाच्‍या संकटात एकमेकांना मदतीचा हात देण्याची गरज असताना भांडणाऱ्या या महाभागांमुळे ग्रामीण भागातील वातावरण खराब होताना दिसत आहे.

घटना पहिली बुलडाणा ः बुलडाणा शहरातील इकबालनगरात घरासमोरून दुचाकी हटविण्यास सांगितल्याच्‍या कारणावरून पाच जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. त्‍याच्‍या वडील आणि काकालाही सोडले नाही. यात दोघे जखमी झाले आहेत. ही घटना काल, 3 मे रात्री आठच्‍या सुमारास घडली. मोहम्मद नईम (35) याने दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी फरान शेख, सोहेब शेख, सईद शेख, बब्बू शेख, असलम शेख (सर्व रा. इकबालनगर) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. मोहम्मद नईमने तक्रारीत म्‍हटले आहे, की अदनान कुरेशी याला घरासमोरून मोटारसायकल हटविण्यास सांगितल्यावरून पाच जणांनी मिळून माझ्या बायकोला शिविगाळ केली. मला घरात घुसून लाकडाने मारहाण केली. वडील आणि काकालाही लाकडाने मारले. यात माझ्या आईची अडीच तोळ्याची सोन्याची चैन (किंमत 1 लाख रुपये) कुठेतरी गळून पडली. तपास एएसआय श्री. शिंदे करत आहेत.

घटना दुसरी बोराखेडी, ता. मोताळाः अमरसिंग  कोळसे व अनुसयाबाई अमरसिंग कोळसे हे दाम्‍पत्‍य आणि सुमनबाई राजेश्वर सुरडकर हे बोराखेडी येथे शेजारी राहतात. सुमनबाई घराच्‍या बांधकामावर पाणी मारत असता अनुसयाबाईने अंगावर पाणी पडल्यावरून वाद घातला. त्‍यानंतर कोळसे दाम्‍पत्‍याने शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्‍याची तक्रार सुमनबाईने बोराखेडी पोलीस ठाण्यात केली. अमरसिंगने हातातील आसारीने सुमनबाईंच्‍या पतीला पायावर व डोक्यावर मारून जखमी केले. बोराखेडी पोलिसांनी कोळसे दाम्‍पत्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

घटना तिसरी माक्‍ता, ता. खामगाव ः तू आम्हाला रोडच्‍या कामावर का नेत नाही, असे म्‍हणून दोघांनी मुकादमासह त्‍याच्या भावाला माक्‍ता येथे मारहाण केली. मुकादम प्रशांत विनायक ताठे (28, रा. माक्ता) याने तक्रार दिली की, नॅशनल हायवे क्रमांक 6 वर नवीन रोडचे काम चालू आहे. तेथे आम्ही ठेकेदाराच्‍या हाताखाली मजुरीचे काम करतो. आमच्‍या गावातील लोकांना सुध्दा मी रोडच्‍या ठेकेदाराने सांगितल्याप्रमाणे कामावर नेत असतो. मी तेथील मुकादम आहे. 2 मेच्‍या रात्री साडेआठच्‍या सुमारास मी व माझा भाऊ सुधीर मोटारसायकलने कामावरून घरी येत असताना गावातील शाळेजवळ थांबलो असता त्याठिकाणी अक्षय गजानन ताठे व शुभम संतोष ताठे हे दोघे आले. त्‍यांनी आम्‍हाला कामावर का नेत नाही असे म्‍हणून वाद घालायला सुरुवात केली. सुधीरच्‍या पाठीवर, पायावर अक्षयने काठीने मारहाण केली. शुभमने चापटाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. मोटारसायकल उभी करत असतानाच गावातील कैलास ताठे, देवलाल ताठे व नागेश ताठे यांनी भांडण सोडवले. या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी शुभम आणि अक्षयविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

घटना चौथी लाडनापूर, ता. संग्रामपूर ः शालीग्राम विश्राम बोदडे (45, रा. लाडनापूर, ता संग्रामपूर) हे शेती करतात. लाडनापूर शिवारात त्‍यांची पाच एकर शेती असून, शेतात विहीर खोदणे सुरू आहे. विहीर खोदण्यासाठी गावातील विठ्ठल तुळशीराम पवार व राजेश मोतीराम साबे यांना मजुरीने सांगितले होते. 2 मे रोजी रात्री 8.30 वाजता शेतात चक्कर मारण्यासाठी बोदडे गेले असता मजूर विठ्ठल पवार व राजेश साबे यांनी विहीर खोदण्याचे उरलेले मजुरीचे पैसे मागितले. त्‍यांना सध्या पैसे नाहीत. पैसे उद्या देतो, असे बोदडे यांनी सांगितले असता आमचे पैसे आत्ताच द्या, असे म्हणून त्‍यांनी बोदडेंना लोटपाट केली. विठ्ठलने बाजूला पडलेली काठी उचलून त्‍यांच्‍या कपाळावर, कानावर, पायावर मारली. राजेशनेही लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. मजुरीचे पैसे तू दिले नाही तर जिवाने मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यावेळी बाजूच्या शेतात असलेले गोविंदा उगले व संतोष गांधी यांनी आमच्या भांडणाचा आवाज ऐकून धावत आले व भांडण सोडवले. बोदडे यांच्‍या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी विठ्ठल व राजेशविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close