क्राईम डायरीमुख्य बातम्या

जीव वाचवण्यासाठी रात्रभर ती जंगलातील खड्ड्यात होती बसून! बलात्कारपीडित तरुणीने ‘Buldana Live’ला सांगितली आपबिती

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) :  20 एप्रिलची रात्र, तिच्यावर गँगरेप झाला, एवढेच नव्हे तर तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने शेतात नेण्यात येत होते… मात्र मध्येच गाडी बंद पडली. याच संधीचा फायदा घेत ती जिवाच्या आकांताने पळत सुटली. अनोळखी परिसर, जंगल, त्यातच रात्रीची वेळ म्हणून जंगलातील एका खड्ड्यात तिने आसरा घेतला. भयाने थरथर कापत रात्र कशीबशी त्या खड्यातच काढली. दुसऱ्या दिवशी एका दुधवाल्याच्‍या गाडीला हात देऊन तिने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. मात्र तिथे तिची तक्रारच घेण्यात आली नसल्याचा आरोप तिने केला आहे. नाईलाजाने ती तिच्या घरी अमरावतीकडे जाण्यासाठी निघाली. घडलेला प्रकार तिने बडनेराचे आमदार रवी राणा यांना सांगितला. आमदार राणा यांनी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. त्‍यानंतर तातडीने सूत्रे हलली. खामगावमध्ये पोहोचताच खामगाव पोलिसांनी तिला पुन्हा बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  22 एप्रिल रोजी युवतीच्या वैद्यकीय तपासण्या झाल्या. मात्र गँगरेप झाल्यानंतर लवकर तपासणी न करता उशिरा तपासण्या केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे.

पीडित 24 वर्षीय युवती अमरावतीची राहणारी आहे. युवतीला आई -वडील नाहीत. 2016 मध्ये तिची अंभोडा (ता. बुलडाणा) येथील मोहन तायडे याच्याशी फेसबुकवरून मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान लग्नाचे अमिष दाखवून मोहनने तिच्‍याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. 2018 मध्ये शेगावला दोघांचे लग्‍न झाले होते. मात्र दोघांच्याही घरच्यांना या विवाहाची कल्पना नव्हती. त्यानंतर पीडित युवतीने मोहनकडे घरी घेऊन जाण्याचा आग्रह केला असता मोहन टाळाटाळ करत होता. फसवले गेल्याची जाणीव झाल्याने तिने मे 2020 मध्येच मोहनविरुद्ध अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी खामगावच्‍या न्यायालयात सुरू होती. 20 एप्रिल रोजी युवती खामगावला आली असता मोहन तायडे याच्यासह चौघांनी तिचे अपहरण करून तिला अंभोडा येथे आणले. तिथे तिच्यावर गँगरेप करण्यात आल्याची तक्रार तिने केली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तिला गाडीत टाकून शेतात नेण्यात आले. मात्र मध्येच गाडी बंद पडल्याने तिने गाडीतून पळ काढला. रात्रभर कशीबशी  काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी हुसकावून लावल्याचे तिने सांगितले.

तपास अप्पर पोलीस अधीक्षकांकडे द्या : आमदार श्वेताताई महाले पाटील यांची मागणी

पीडितेसोबत घडलेला प्रकार भीषण असूनही यावर तातडीने कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षकांकडे देण्यात यावा व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केल्‍याचे आमदार श्वेताताई महाले यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना सांगितले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: