बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जेवणाचा दर्जा चांगला ठेवा, सुविधा पुरवा; कोविड सेंटरबद्दलच्‍या ‘बुलडाणा लाइव्‍ह’च्‍या वृत्ताची विभागीय आयुक्‍तांनी घेतली दखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : कोविड सेंटरमध्ये जेवणाच्‍या आणि अन्य सुविधांबद्दल आज ‘बुलडाणा लाइव्‍ह’ने ‘हाल ए कोविड सेंटर..’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल विभागीय आयुक्‍त पियुष सिंह यांनी घेत कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा असाव्यात. जेवणाचा दर्जा चांगला ठेवावा. स्वच्छतेच्या बाबत कुठलीही तडजोड नसावी, अशा सूचना प्रशासनाला केल्या. सर्व यंत्रणांनी बाधित रुग्णांच्या निकट व बाह्य संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, अशी सूचनाही त्‍यांनी आज, 5 मार्चला केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्तांच्‍या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्‍यावेळी विभागीय आयुक्त बोलत होते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. स्वॅब घेण्याचे प्रमाण जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वाढविण्याचे आदेशित करत विभागीय आयुक्त म्हणाले, की ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवावे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील कुणीही सुटता कामा नये. बाधित रुग्‍णांना कोविड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावी. होम आयसोलेशनची सुविधा बंदच ठेवावी. होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. जेणकरून बाधित रुग्ण बाहेर फिरत असल्यास दिसून येईल. ज्या रुग्णांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था आहे, अशा रूग्णांना होम आयसोलेशन दिले असल्यास त्यांच्या घरावर विलगीकरण केल्याच्या तारखेसह स्टीकर चिकटवावे. आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांचे टेस्टिं‍ग करून घ्यावे. दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांचे आठवड्याला तपासणी करून घ्यावी. लसीकरणाबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, की आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. सुपर स्प्रेडरच्या कोविड चाचण्या बंधनकारक कराव्यात. शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टसिंगचा नियम पाळावा व हात वारंवार धुवावे या त्रिसूत्रीचे कटाक्षाने पालन झाले पाहिजे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडनीय कारवाई करण्यात यावी. बैठकीला संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पॉझीटीव्ही रेट, मृत्यू दर, ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड आदींचाही आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: