जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

डॉ. रायमूलकर यांच्‍या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी पदाचा राजीनामा दिल्‍यानंतर आता या रिक्‍तपदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्‍या नावाची चर्चा प्राधान्याने होत असल्याने जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळणार असल्याची शक्‍यता आहे. विजयाची हॅट्‌ट्रिक गाठणारे डॉ. रायमूलकर मंत्री झाले तर खासदार प्रतापराव जाधव यांना एकाचवेळी अनेक गोष्टी शक्‍य होणार आहेत.
खासदार जाधव यांच्‍या विश्वासातील म्‍हणून डॉ. रायमूलकर यांची ओळख आहे. खासदार साहेब सांगतील तीच पूर्वदिशा हाच कायम शिरस्‍ता डॉ. रायमूलकर यांचा राहिला आहे. याचे कारण त्‍यांची राजकीय जडणघडण मुळातच खासदार जाधव यांच्‍या छत्रछायेखाली झाली आहे. सध्या जिल्ह्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्‍या रूपाने एक मंत्रिपद आहे. तेच जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार जाधव यांना डॉ. शिंगणेंनी आव्‍हान दिले होते. ते राजकीय वैरत्‍व अजूनही कायम आहे. सध्या महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्‍ही पक्ष सत्तेत एकत्र असल्याने नाइलाजाने का होईना हे नेते एकत्र येताना दिसतात. तरीही मनातील खदखद काही जात नाही. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना पुढे करून का होईना या राजकीय वैराचे दर्शन सतत घडवले जाते. सत्तेत एकत्र असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जिल्ह्यात राजकीय शत्रूच आहेत, हे वारंवार दिसून आले आहे. मागे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि डॉ. शिंगणे यांच्‍यातील वाढती मैत्री बुलडाणा लाइव्‍हने समोर आणली होती. ते वृत्त प्रसिद्ध होताच गायकवाड हे डॉ. शिंगणेंसोबत नंतर फारसे दिसले नाहीत. पालकमंत्री असल्याने एकूण प्रशासन आणि जिल्ह्यातील राजकारणावर डॉ. शिंगणे यांचा दबदबा तयार झाला आहे. ही बाब खासदार जाधव यांच्‍या दृष्टीने चिंताजनक आहे. भविष्यात ती नुकसानकारकही ठरू शकते. त्‍यामुळे डॉ. रायमूलकर यांच्‍या निमित्ताने शिवसेनेकडेही एक मंत्रिपद घेतले तर शिवसेनेची आणि पर्यायाने खासदार जाधव यांचीही डोकेदुखी कमी होऊ शकते. रिक्‍त झालेले मंत्रिपद विदर्भातच राहील हे नक्‍कीच आहे. हे पद शिवसेनेच्‍याच आमदाराला दिले जाईल हेही नक्‍की आहे. त्‍यामुळे विदर्भाचा विचार केला तर सेनेचे 4 आमदार आहेत. मात्र सध्या चर्चा सुरू झालीये ती डॉ. रायमूलकर यांच्‍या नावाची. २००९, २०१४ व २०१९ अशा तीन निवडणुकांत सलग वाढत्‍या मताधिक्‍याने डॉ. संजय रायमूलकर विजयी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत. बुलडाण्यात सेनेचे संजय गायकवाड आमदार आहेत.सध्या डॉ. रायमूलकर यांच्‍याकडे पंचायत राज समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता मंत्रिपद रिक्‍त झाल्याने डॉ. रायमूलकर यांच्‍या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खासदार जाधव हेही त्‍यांच्‍यासाठी प्रयत्‍न करणार हेही नक्‍कीच आहे. चारही आमदारांपैकी डॉ. रायमूलकर अनुभवी असल्याने पक्षप्रमुखांकडून त्‍यांच्‍या कार्याची दखल मंत्रिपदासाठी घेतली जाऊ शकते, अशी शक्‍यता आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: