खामगाव (घाटाखाली)मुख्य बातम्या

तुझ्या बापाचा नोकर आहे तो.. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार कर… मरायचं असेल तर मर… शेगावच्या आयटीआयमधील प्राचार्य महिलेची भाषा!; शेगावमध्ये वातावरण तापले!!

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेेवा) ः शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्यांनी विद्यार्थ्याशी केलेल्या असभ्य वर्तनाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे. या प्राचार्यांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी राजकीय पक्ष, संघटना आक्रमक झाल्या असून, आज, 4 जानेवारीला दुपारी शेगावमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने प्राचार्यांची प्रतिकात्मक तिरडी काढून दहन केल्याने खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत डिझेल मॅकेनिकलला शिकणार्‍या आम्रपाल भिलंगे या विद्यार्थ्याशी असभ्य वर्तन प्राचार्या करताना दिसत आहे. आम्रपालला पुढील शिक्षणासाठी त्याची मूळ कागदपत्रे शेगाव येथील आय.टी.आय.मधून हवी होती. यासाठी तो अर्ज घेऊन प्राचार्यांकडे गेला होता. त्यावेळी त्याच्याशी बोलताना प्राचार्यांचा तोल ढळला आणि पदाची गरिमा विसरून त्या नको त्या भाषेत बोलू लागल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. हा प्रकार समोर आल्याने शहरातील राजकीय पक्ष, संघटना तापल्या आहेत. मला परत तोंड दाखवायचं नाही. मला फक्त अ‍ॅडमिशन दिसतात. बाकी काही दिसत नाही. तुझं करिअर तू ठरवं. तुझ्या बापाचा नोकर आहे तो.. मुख्यमंत्र्याकडे तक्रार कर.. मरायचं असेल तर मर… अशी भाषा या प्राचार्यांच्या तोंडी आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश घोंगे यांनी विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून आज या प्राचार्यां प्रतिकात्मक तिरडी काढली. शवयात्रा आयटीआयसमोर आणत प्राचार्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रतिकात्मक शवाला अग्नीही दिला. लवकरात लवकर विद्यार्थ्याला न्याय देऊन प्राचार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रहारतर्फे मोठे आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सिद्धनाथ केगरकर, राजू मसने यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही आक्रमक

आयटीआय प्राचार्यांचा प्रताप समोर येताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही संतप्त झाली असून, त्यांनी प्राचार्यांवर कडक कारवाई करावी व विद्यार्थ्याला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत या प्रश्‍नी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे पाटील यांनी सांगितले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: