बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

‘त्यांना’ना कोरोनाची भीती ना कर्फ्यूचे भय! ‘खाकी’लाही नाय घाबरत, केवळ ‘श्रीराम’च करतात त्यांचा बंदोबस्त!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातलेला,  दिवसा संचारबंदी, कडक लॉकडाऊन अन्‌ रात्री कर्फ्यू, तैनात पोलीस असे असतानाही ‘ते’ कुणालाच मोजत नाहीत. पालिका- महसूल कर्मचारीच काय पोलीस दादांनाही घाबरत नाहीत. त्यांचा मुक्त संचार रोखण्याचा प्रयत्‍न केला तर उलट त्यालाच दंड देतात, मात्र एवढे उपद्रवी अन्‌ बेडर असले तरी ते फक्त ‘श्रीराम’ लाच घाबरतात…

आता हे वर्णन कुणाचं असा प्रश्न वाचकांनाच काय सर्वांनाच पडणे स्वाभाविक आहे.  हा लय भारी जीव म्हणजे साप! आता साप म्हटलं की भल्या भल्याला थरकाप  सुटतो. त्यामुळे त्याला कोण अडवणार म्हणा?  त्यामुळे कडक निर्बंधामधी त्यांचा मोकाट संचार सुरूच आहे. मग त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ‘श्रीराम’लाच पाचारण केले जाते. आता काल म्हणजे 27 एप्रिलला एका बहाद्दराने थेट डीएसपींच्या बंगल्यातच हजेरी लावली. लांडे ले आऊट परिसरातील पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातील सुरक्षा कवच भेदून त्याने कुठून प्रवेश केला कुणास ठाऊक? मग तैनात पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून तो सुटला नाय! त्यांनी तात्काळ सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना आवतन धाडताच ते घटनास्थळी दाखल झाले. घनदाट बांबूमध्ये घुसलेल्या धामण जातीच्या सापाला त्यांनी एएसआय आरिफ मेजर, शेळके, मिसाळ यांच्या साक्षीने पकडून बरणीमध्ये लॉकडाउन केले!

वृंदावनमध्ये प्रकटले नागराजा!

दरम्यान त्यापूर्वी वृंदावन नगरमधील ऊर्जा कॉलनीमध्ये एक नागराज प्रकटल्याने रहिवासीयांची  तारांबळ उडाली! ज्या घरात हा नाग घुसला त्या घराचे मालक संजय राऊत हे त्यावेळी धाड गावात होते. त्यामुळे घरातील सदस्य भयभीत झाले असते. शेजार धर्म पाळणाऱ्यांनी श्रीरामभाऊंनाच साकडे घातले! त्यांनी पायरीवर सैर सपाटा मारणाऱ्या 2 फूट लांब नागाला बरणीच्या स्वाधीन केल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला!

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: