बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

थर्मलगनने होणार मतदारांचे स्वागत, मतदान होईपर्यंत जावे लागणार अनेक दिव्यातून… पीपीए किटमधील सायब ठेवणार लक्ष!; निवडणूक ग्रामपंचायतीची….

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रवेशद्वारी थर्मलगन घेऊन उभे आरोग्य कर्मचारी, कोविडचे पोस्टर्स, हात धुण्याची सोय, येणार्‍यांसाठी सोशल डिस्टन्सची वर्तुळे, सॅनिटायझरचा घमघमाट अन् पीपीए किटमधील सायब! हे वर्णन एखाद्या हॉस्पिटल वा क्लिनिकचे असेल असे जर वाचकांना वाटले तर ते साफ चुकीचे आहे! याचे कारण हे वर्णन आहे उद्या होणार्‍या 498 ग्राम पंचायतींच्या निवडणुकीतील मतदान केंद्राचे! आज, 14 जानेवारीला रात्री ही सर्व केंद्रे व मतदान साहित्य सॅनिटाइज करण्यात येणार असून, हे कोविड विषयक पुराण यावरच संपलेले नाहीये. उद्या 15 जानेवारीला सकाळी 7ः 30 ते संध्याकाळी 5ः30 वाजेदरम्यान 1795 केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांचा बातमीच्या शीर्षकात म्हटलंय त्याप्रमाणे अजब गजब थाट राहणार आहे.

जिल्ह्याच्या वा ग्रामपंचायत निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडतेय. यामुळे यंदाची निवडणूक अभूतपूर्व ठरलीय. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आज संक्रांतीला रात्री सर्व केंद्र व मतदान साहित्य सॅनिटायज करण्यात आले. उद्या मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारातच हाती थर्मलगन घेऊन उभे असलेले आरोग्य कर्मचारी वा आशा वर्कर सर्व मतदारांचे तापमान तपासणार आहेत. जास्त ताप असला की त्याला टोकन देऊन वेगळ्या कक्षात बसविण्यात येईल. याचबरोबर तिथे साबण वा सॅनिटायझर, कोरोना जागृतीची पोस्टर्स राहणार आहेत. यातून सुटका झाल्यावर पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक- गरोदर स्त्रिया, दिव्यांग मतदारांसाठी 3 रांगा राहणार आहेत. त्यांनी सुरक्षित अंतर पाळावी यासाठी वर्तुळे काढण्यात येणार आहेत. अंतर पाळण्यात येते का यावर बीएलओ व स्वयंसेवकांची करडी नजर राहणार आहे. उघड्या तोंडाने येणार्‍या मतदारांना मास्क देखील पुरविण्यात येईल. हे झाले बाहेरचे, आता आतील भागात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस दादा यांना मास्क, फेस शिल्ड, ग्लोज यांनी सज्ज राहणार आहे. त्यांच्यासमोर एकच मतदार उभा राहणार आहे. कर्मचारी व मतदान एजंट यांच्यात अंतर राहणार असून, ताप जास्त असल्यास एजंट बदलण्यात येईल, हे यावरच संपले असे नसून, सही करणे ईव्हीएमचे बटन दाबण्यापूर्वी मतदारांना सॅनिटायझर देण्यात येईल. मतदान संपण्याच्या अर्ध्या तासापूर्वी कोरोना बाधित व जादा तापामुळे विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या मतदारांना मतदानाची संधी देण्यात येणार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: