क्राईम डायरीमुख्य बातम्या

दागिने काढून घेत घराबाहेर हाकलले; दोन लाख आणेपर्यंत घरात नाे एंट्री!; विवाहितेची “आपबिती’, मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंगावरील सर्व दागिने काढून घेत विवाहितेला घराबाहेर हाकलले. फर्निचरचा व्यवसाय करण्यासाठी दोन लाख रुपये माहेरावरून आण तरच घरात घेऊ, अशी धमकी विवाहितेला देण्यात आली. नांदवतानाही वारंवार होणारी मारहाण आणि आता पैशांसाठी छळ असह्य झाल्याने २२ वर्षीय विवाहितेने डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. पूजा ऊर्फ कविता सूरज सातपुते (रा. सिंदखेडराजा ह. मु. अंजनी, ता. मेहकर) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिचा पती सूरजसह जयश्री छबुराव सातपुते, संजना छबुराव सातपुते, भागवत फैत्या भोसले (सर्व रा. सिंदखेडराजा), प्रियांका धारासिंग पवार (रा. देऊळगाव राजा) अशी आरोपींची नावे आहेत. पूजाचे लग्न सूरजसोबत २२ एप्रिल २०१६ रोजी झाले होते. काही दिवस पतीने तिला चांगले वागविले. नंतर छोट्या छोट्या कारणावरून तो तिला मारहाण करत होता.

लग्नात हुंडा दिला नाही म्‍हणून सासरचे मंडळी अपमान करून शारीरिक व मानसिक छळ करत होते. पतीने फर्निचरचा व्यवसाय करण्यासाठी तुझा वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये. तरच तुला वागवितो, असे म्हणत मारहाण केली. त्‍याच्‍यासह सासरच्यांनी अंगावरील दागदागीने काढून घेऊन घरातून हाकलून दिले. तुला घरात यायचे असेल तर दोन लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले. पूजाने मेहकरच्‍या महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार दिली होती. मात्र आपसात समझोता न झाल्‍याने तिने डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून सासरच्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय अशोक नरुटे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: