क्राईम डायरीमुख्य बातम्या

दागिन्यांसाठी दोन दिवसांवर आलेले लग्‍न मोडले!; बुलडाण्याच्‍या नवरोबाची आता पोलीस काढणार वरात!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लग्‍नाची पूर्ण तयारी झालेली… पत्रिका छापल्या गेल्या… मंगल कार्यालयाचेही बुकिंग झाले… पंचपक्वान्नाची ऑर्डरसुद्धा दिली… वधूच्या घरी लगीनघाई सुरू… लग्‍न दोन दिवसांवर आले… मात्र नवरदेवाकडच्या मंडळींच्या डोक्यात काही वेगळेच होते. लग्न दोन दिवसांवर आले असताना दागिने कमी केल्याचे कारण सांगत वराकडील मंडळींनी लग्न मोडल्याचा निरोप वधूपित्याला पाठवला. यामुळे वधूकडील मंडळीला मोठा धक्का बसला. बुलडाण्यातील या नवरोबा आणि त्‍याच्‍या कुटुंबियांच्‍या विरोधात वधूकडील मंडळीने अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी नवरदेवासह त्‍याच्‍या कुटुंबियांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश ऊर्फ मयूर जगन्‍नाथ सोळंके, जगनाथ सोळंके आणि सविता जगन्नाथ सोळंके (रा. जुन्या बसस्टँडमागे, बुलडाणा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेशचा विवाह अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील एका शेतकरी कुटूंबातील मुलीशी 28 फेब्रुवारीला होणार होता. मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी केली होती. कपडे, किराणा, लग्नपत्रिका, सर्व प्रकारचे बुकिंग झाले होते. नवरदेवासाठी सुद्धा सोने खरेदी केले होते. यासाठी त्यांचा लाखो रुपयांचा खर्च झाला होता. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता नवरदेव आणि नवरदेवाच्या आई- वडिलांनी मुलीच्या वडीलाला फोन करत सोने वाढवून देण्याची मागणी केली. आपली सोने वाढवून देण्याची ऐपत नाही असे मुलीच्या वडिलांनी म्हटल्यावर तुम्ही जर सोने वाढवून देणार नसाल तर आम्ही लग्नाला येत नाही. तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, अशी धमकी नवरदेवाच्या पित्याने दिली. मुलीच्या वडिलांनी विनंती केली असता फोन कट केला. त्यामुळे मुलीचे वडील, आई आणि मुलीलाही प्रचंड धक्का बसला.यात मुलीच्या आई- वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले.अखेर मुलीच्या वडिलांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केल्यानंतर पोलिसांनी बुलडाण्याच्या नवरदेव आणि नवरदेवाच्या आईवडिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: