बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

दिवसभर ‘आपत्ती’चा सामना… घरी आल्यावर रात्री भलतेच संकट!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : दिवसभर नैसर्गिक व अन्य जबाबदारीच्या आपत्ती झेलून घरी पोहोचल्यावर अचानक आलेल्या प्राणघातक पाहुण्याने साहेब काहीसे भयभीत झाले! मात्र हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यावर नियंत्रण करून त्यांनी  ‘त्या ‘ मित्राला बोलविले अन्‌ स्वतःला भयमुक्त करवून घेतले!

या खळबळजनक व क्रीडा संकुल परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या घटनाक्रमाची हकीकत अशी, की जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (सामान्य प्रशासन) संजय बनगाळे यांच्याकडे नैसर्गिक आपत्ती व अन्य कामांची जबाबदारी आहे. याशिवाय कोरोना विषयक काही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आज शुक्रवारी ( दि. 12) दिवसभर  विविध जबाबदाऱ्या पार पाडून ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील आपल्या घरी पोहोचले. रात्री 7.45 वाजताच्या सुमारास त्यांना वेगाने जाणारा ‘जीव’ दिसला. ग्रामीण भागातील रहिवासी असल्याने त्यांनी लगेच ओळखले हा जीव साप आहे. यामुळे त्यांच्यासह बनगाळे फॅमिलीचा काही काळ जीवाचा थरकाप उडाला! मात्र साहेबांनी लगेच स्वतःला सावरून सर्पमित्र श्रीराम रसाळ याना फोन करताच ते घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या चिखली शाखेतील आपली ड्युटी पूर्ण करून आलेले रसाळ यांनी थकवा विसरून शिताफीने व आपला अनुभव पणाला लावून 5 फूट लांबीचा कोब्रा ( नाग) पकडून त्याला बरणी बंद केले. यामुळे केवळ एकच कुटुंब नव्हे परिसराला त्यांनी भयमुक्त केले. या अतिविषारी नागराजाला उद्या वन्य जीव कार्यालयात देणार असल्याचे रसाळ यांनी सांगितले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: