क्राईम डायरीमुख्य बातम्या

दुसरी बायको करण्यासाठी पहिलीचा छळ! 5 जणांविरोधात नांदुऱ्यात गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुसरे लग्‍न करण्यासाठी फारकत देत नसल्याने विवाहितेचा छळ करणाऱ्या व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह 5 जणांविरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात काल, 23 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 22 मे रोजी विवाहितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती.

नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे माहेरी आलेल्या 21 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती सचिन मधुकर ठाकरे (26), दीर नितीन मधुकर ठाकरे (दोन्ही रा. कार्ला, जि. अकोला, ह. मु. पुणे), सासरा मधुकर मारोती ठाकरे, सासू वंदना मधुकर ठाकरे (रा. कार्ला, जि. अकोला), नणंद सारिका सुशील लाहुडकर (रा. लोहारा ता. बाळापूर, जि. अकोला) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचा वर्षभरापूर्वीच सचिन ठाकरेसोबत विवाह झाला होता.

मात्र त्‍याला दुसरे लग्न करायचे असल्याने विवाहितेने स्वतःहून त्याला फारकती द्यावी यासाठी तो तिचा छळ करत होता. यात सचिनचा भाऊ नितीनसुद्धा त्‍याला मदत करत होता. दोघांनी मिळून तिला मारहाण केली. इतर तिघांनी सुद्धा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून  ती गेल्या काही दिवसांपासून वडनेर भोलजी येथे माहेरी आलेली आहे. तिच्‍या कुटूंबियांनाही त्‍यांनी फोन करून फारकत दिली नाही तर जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा  दाखल केला आहे. तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close