बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

देऊळगाव राजात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले!; सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात, भाजपला भोपळा!; वाचा कुणाला लागला गुलाल…

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता राहील, हा प्रस्थापितांना समज देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामस्थांनी खोटा ठरला. अनेक ग्रामपंचायतींवर मतदारांनी सत्तापरिवर्तन घडवले असून, काही ठिकाणी तरुणांना संधी दिली आहे.

जुन्या पालिका टाऊन हॉलमध्ये सकाळी 9 वाजता मतमोजणी सुरू झाली. अपेक्षेप्रमाणे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता. तालुक्यातील त्या त्या गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने निकाल ऐकण्यासाठी आले होते. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला झाल्या होत्या. सर्वांत आधी पोस्टल मतमोजणी करण्यात आली. देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळगाव मही येथे जिल्हा परिषदेचे सदस्य रियाज खान पठाण यांच्या पॅनलचे 11 सदस्य निवडून आले तर विरोधी पॅनलला 6 सदस्यांवर समाधान मानावे लागले. प्रिंपी आंधळे येथे पत्रकार अर्जुन आंधाळे यांच्या पॅनलने 5 जागा मिळवल्या, तर विरोधकांना 2 जागा मिळाल्या. तुळजापूर येथे गोपीचंद कोल्हे यांच्या पॅनले 6 जागा तर विरोधकांना 3 जागा मिळाल्या.

चिंचोली येथे गणेश बुरुकुल यांच्या पॅनलने 5 तर विरोधकांना 2 जागा मिळाल्या. सावखेड भोई येथे पंचायत समिती उपसभापती हरिभाऊ शेटे यांनी उभे केलेल्या पॅनलचा विजय झाला. त्यांना 5 जागा मिळाल्या. प्रतिस्पर्धी पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. टाकरखेड वायाळ येथे ग्रामविकास पॅनलने 6 जागा जिंकल्या तर विरोधी पॅनला केवळ 1 जागा मिळाली. उंबरखेड येथे माजी सरपंच गजाजन काकड व जिल्हा परिषद सदस्य व गट नेते मनोज कायंदे यांनी उभे केलेल्या पॅनलने सर्वच्या सर्व 7 जागा मिळवल्या. निमगाव गुरू येथे माजी सभापती पती राजू चित्ते यांच्या पॅनलने 6 जागा तर विरोधकांनी 1 जिंकली. पळसखेड झाल्टा येथे गणेश मुंढे यांच्या पॅनलने 4 तर विरोधकांना केवळ 3 जागा मिळाल्या. गिरोली येथे माजी सरपंच बाबासाहेब म्हस्के या गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. खल्याळ गव्हाण येथे जि. प. सदस्य सिंपणे ताई यांच्या पॅनलने 6 जागा जिंकल्या तर विरोधकांना 3 जागांवर समाधान मानावे लागले. जवळखेड येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव यांच्या पॅनलने 6 तर विरोधकांनी 3 जागा जिंकल्या.

राष्ट्रवादीचा गजर घुमला…

पाडळी शिंदे, नागनगाव, पिंपळगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एकूणच देऊळगाव राजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त 15 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. त्या खालोखाल शिवसेना (8), काँग्रेसचा (3) नंबर लागतो. भाजप तालुक्यात भोपळा मिळाला आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विजयी उमेदवारांनी गुलाल व फटाके फोडून शहरातील बस स्थानक येथे विजयी मिरवणूक काढण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव दल प्रशासनाच्या वतीने तैनात करण्यात आले होते. या निवडणुकीत सर्वात जास्त तरुण उमेदवारांना मतदार राजा याने पसंती दिली आहे. तरुण उमेदवार निवडून येण्याची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली दिसून येत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: