जिल्ह्याचं राजकारण

देऊळगाव राजा ः गावपुढार्‍यांना राजकीय नेत्यांनी सोडले वार्‍यावर!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिवाचे रान करून नेत्यांसाठी त्यांच्या निवडणुकीत राब राब राबायचे पण जेव्हा आपली बारी आली तेव्हा नेत्यांनीच चालढकल करायची, अशी भावना सध्या गावपुढार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीची हवा असून, प्रतिस्पर्ध्याला उमेदवारी मागे घ्यायला लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांत मात्र राजकीय नेत्यांनी मध्यस्थीस पाठ फिरवल्याने गावपुढारी चिंतित आहेत.

देऊळगाव राजा तालुक्यातील 48 पैकी 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींतील 598 जागांसाठी 648 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. छाननी अंती पंधरा अर्ज अवैध आहेत. त्यामुळे आता 633 उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील पाडळी शिंदे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. येथे 9 जागांसाठी 9 अर्ज आले होते. बिनविरोधची औपचारिक घोषणा तहसीलदार उद्या 4 जानेवारीला करतील. अर्ज मागे घेण्याची तारीख 4 आहे. अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी गाव पुढार्‍यांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या गावागावात इलेक्शन फिव्हर आहे. गावपुढारी आपलेच पॅनल निवडून यावे म्हणून झटत आहेत. मात्र सध्या दिसून येणारी एक आश्‍चर्याची बाब म्हणजे राजकीय पुढार्‍यांनी गाव पुढार्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. हेच गाव पुढारी राजकीय नेत्यांच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जीवाचे रान करून गावागावातून आपल्या पक्षाला लीड देत असतात. मात्र यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीत नेत्यांनी पाठ फिरवली आहे. अर्ज मागे घ्यायला लावण्यात राजकीय नेत्याच्या शब्दाला मान असतो. परंतु तालुक्यातील कोणत्याच राजकीय नेत्याने पुढाकार घेतलेला पाहावयास मिळत नाही.

गावागावात दोन ते तीन गट असतात. एका गटाला जवळ धरले तर दुसरा गट नाराज होण्याची भीती राजकीय पक्षाला असते. ही नाराजी नको म्हणून व ग्रामपंचायत निवडणूक शांतपणे पार पडावी म्हणून कोणत्याही राजकीय पक्षातील नेते या निवडणुकीत सहभागी होत नाहीत.

– गणेश बुरुकुल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते

ग्रामपंचायत निवडणूक ही गाव पातळीवरची निवडणूक आहे. गावांमध्ये गट असतात. एका गटाला जवळ केले की दुसरा गट नाराज होतो. ही निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे राजकीय नेते सहसा सहभाग घेत नाहीत.

– मनोज कायंदे, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: