क्राईम डायरीमुख्य बातम्या

आत्‍मघातवार! 5 आत्‍महत्‍या!! दोन तरुण, दोन वृद्ध महिलांसह विवाहित तरुणीने संपविली जीवनयात्रा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 22 मार्चला जणू आत्‍मघातवार उगवला होता की काय, अशी शंका यावी, इतक्‍या लोकांनी आत्‍मघात केल्याचे समोर आले आहे. तीन महिलांसह दोन युवकांच्‍या आत्‍महत्‍या जिल्ह्यात घडल्या आहेत. बुलडाणा, नांदुरा, खामगाव तालुक्‍यातील या घटना आहेत.

बुलडाणा शहरातील वावरे ले आउट भागात राहणाऱ्या सुकल्प मुकुंद नेमाने याने राहत्या घरी गळफास घेतला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मोताळा तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी असलेले मुकूंद मेमाने हे मागील काही वर्षांपासून शहरातील वावरे ले आऊट परिसरात वास्तव्यास आहेत. ते जालना जिल्ह्यातील शिवना येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सुध्दा शिक्षिका आहे. सुकल्पने घरात कोणीच नसल्याचे पाहून दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुकल्पचे शिक्षण सुरू होते. मित्रपरिवारात अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने सुकल्प आत्महत्येचे पाऊल उचलेल असे कोणालाही वाटलं नव्हते.त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, याचे कारण अद्यापही समजले नाही. प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येळगाव (ता. बुलडाणा) येथे ३० वर्षीय युवकाने विष पिऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. वैभव विलास जाधव असे या युवकाचे नाव आहे. कुटुंबियांनी वैभवला तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. वैभवने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशला आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.

नांदुरा येथील आमचे  प्रतिनिधी प्रविण तायडे यांनी पोलीस सूत्रांच्‍या हवाल्‍याने दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी येथे 58 वर्षीय लताबाई गुलाबसिंग राजपूत यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना सकाळी समोर आली. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. नांदुरा पोलिसांनी आकस्‍मित मृत्‍यूची नोंद केली आहे.

खामगावचे प्रतिनिधी भागवत राऊत यांनी पोलीस सूत्रांच्‍या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, राहुल मुकुंदराव जोशी (34 रा. सिद्धीविनायक नगर,  घाटपुरी रोड खामगाव येथे राहतात. त्‍यांनी मलकापूर येथील विनायक दामोदर पानट यांची मुलगी जान्हवी हिच्याशी लग्न केले होते. घरात कोणी नसताना जान्हवीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 21 मार्चला सकाळी आठ ते रात्री आठच्या सुमारास घडली. तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक श्री. कटारे करत आहेत.

खुटपुरी (ता. खामगाव) येथील सौ. प्रमिला किसन गवळी (60) या 20 मार्चला दुपारी चारच्या सुमारास शेतातून घरी आल्‍या व चक्कर येऊन पडल्‍या. कुटुंबीयांनी त्‍यांना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून प्रमिला यांनी विषारी औषध घेतले असल्याचे निदान केले व पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले. अकोला येथे उपचारादरम्यान काल पहाटे 5.16  वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे श्री. तडवी करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: